पुणे – बेकायदेशीरपणे रक्त चंदनाची वाहतुक केल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी अटक केलेल्या दोघांना सत्र न्यायाधीश प्रदीप अष्टुरकर यांनी जामीन मंजुर केला आहे.
विनोद प्रकाश फर्नांडीस (वय 45) आणि निर्मलसिंग ऊर्फ मिन्टो मंजितसिंग गील (वय 26, दोघेही, रा. नवी मुंबई) अशी त्या दोघांची नावे आहेत. दोघांनी ऍड. गणेश भूमकर यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला. ऍड. भूमकर यांना ऍड. बंटी गायकवाड, ऍड. मिलिंद डोंबे, ऍड. योगेश बावीकर, ऍड. अमजद खान, सिध्दार्थ धेंडे यांनी मदत केली. याबाबत पोलीस नाईक वंदु गिरे यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीला संशियितरित्या एक कार पार्क केलेली दिसली. चौकशी केली असता, दोघेही उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली. पोलिसांनी एकाचा मोबाईल तपासला. त्यामध्ये टेम्पोचा फोटो दिसला. अधिक तपास केला असता, त्यातून रक्तचंदनाची बेकायदेशीर वाहतुक करण्यात येणार असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सहा कोटी रुपयांच्या 6 हजार 420 किलो रक्तचंदन टेम्पोसह जत्प करत गुन्हा दाखल केला.
या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या फर्नांडीस आणि गील यांनी जामिनासाठी ऍड. गणेश भूमकर यांच्यामार्फत अर्ज केला. दोघांनी कोणताही गुन्हा केलेला नाही. त्यांचा विशिष्ट रोल नाही. टेम्पो आणि त्यातील माल जप्त करण्यात आला आहे. दोघांकडून काहीही जप्त करण्यात आलेले नसून, दोघेही कुटुंबातील कर्ते आहेत. त्यामुळे जामीन देण्याची मागणी ऍड. गणेश भूमकर यांनी केली. प्रॅक्टीकली गुन्हाचा तपास संपला असल्याचा निष्कर्ष काढत न्यायालयाने हा निकाल दिला.