मुंबई : महाराष्ट्र राज्याचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे आज शपथ घेणार आहेत. आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. त्यांच्यासोबत दोन उपमुख्यमंत्री देखील शपथ घेतील. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थिती असणार आहे. शपथविधीची जय्यत तयारी करण्यात आली असून देशभरातील अनेक दिग्गज नेते या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
राज्यातील ‘या’ नेत्यांना देण्यात आले निमंत्रण
राज्यातील अनेक बड्या नेत्यांना देखील या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे, शरद पवार, राज ठाकरे (Raj Thackeray), उध्दव ठाकरे, सुशीलकुमार शिंदे यांच्यासह अन्य नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे.
राज ठाकरे ‘या’ कारणामुळे राहणार अनुपस्थित
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना शपथविधीचं खास निमंत्रण देण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः फोन करून राज ठाकरे यांना निमंत्रण दिले होते. मात्र, काही व्यक्तिगत कारणामुळे राज ठाकरे शपथविधीला अनुपस्थित राहणार आहेत. तसेच त्यांनी फडणवीसांना मुख्यमंत्री पदाबाबत शुभेच्छा देखील दिल्या आहेत आणि महाराष्ट्राच्या हितासाठी चांगले काम करावे अशा शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
शरद पवारदेखील राहणार अनुपस्थित
आज होणाऱ्या शपथविधीसाठी देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना निमंत्रण दिलं आहे. सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे शरद पवार शपथविधीला येणार नाहीत अशी माहिती समोर आली आहे.
ठाकरे पिता – पुत्र राहणार अनुपस्थित
माजी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना आजच्या शपथविधीचे निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र, या शपथविधी कार्यक्रमाला उद्धव आणि आदित्य ठाकरे दोघेही अनुपस्थित राहणार असल्याचे समोर आले आहे.