भोर -भोर तालुक्यातील उत्रौली येथे एकाचा, तर पुणे-सातारा महामार्गावरील किकवी येथे एकाचा असे दोघांचे करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे आणि गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी सांगितले.
भोर तालुक्यातील करोनाबाधितांच्या संख्येने एकशेपंचविशी पार केली असून, आजपर्यंत 67 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. 56 बाधितांवर भोर व पुणे येथे उपचार सुरू आहेत. करोनाची आज लागण झालेल्या उत्रौली आणि किकवी गावास उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव व तहसीलदार अजित पाटील यांनी भेट देऊन करोनाचा संसर्ग टाळण्यासाठीच्या उपाययोजनांची माहिती ग्रामस्थांना दिली आहे.
उत्रौली ग्रामस्थांनी गावात कडक निर्णय घेऊन सर्व दुकाने बंद केली असून कोणीही तोंडाला मास्क लावल्याशिवाय गावात वावरू नये, अशा सूचना ग्रामस्थांना देऊन जनजागृती केली जात आहे. उत्रौली हे गाव पाच हजारांपेक्षा जास्त लोकसंख्येचे असल्याने सरकारने खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत.
भोर येथील महावितरण कंपनीच्या दोन शाखा अभियंत्यांस करोनाची लागण गुरुवारी (दि. 16) पुणे मुक्कामी झाली असल्याची माहिती भोरच्या महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता यांनी दिली आहे.