अहमदपूर – नियमितपणे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या दोघा जणांना आज सकाळी शिरूर ताजबंद ते मुखेड रोडवर एका अज्ञात वाहनाने चिरडल्याने त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताबाबत अधिक माहिती अशी की, शिरूर ताजबंद येथील श्रावण रामराव सोमवंशी (वय 52) व प्रतिभा शिवाजी आठखिळे (वय 48) हे दोघे बुधवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी शिरूर ताजबंद ते मुखेड रोडने निघाले.
सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास शिरूर मुखेड रोडवर अनिल पाटील यांच्या शेताजवळ एका अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी रविंद्र शिवाजी (आठखिळे रा. वळसंगी, ता. अहमदपूर) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात अहमदपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव हे अधिक तपास करीत आहेत.