पाथर्डी: शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू होण्याची घटना तालुक्यातील मोहोज खुर्द येथे घडली. या घटनेत गणेश राजेंद्र वांढेकर (वय 17), श्रीकृष्ण सयाजी मतकर (वय 14 दोघेही रा. मोहोज खुर्द) ही मुले मयत झाले आहेत. या संदर्भात सायंकाळी उशिरापर्यंत पोलीस स्टेशनला कोणतीही नोंद करण्यात आली नव्हती.
मोहोज खुर्द येथे राजेंद्र उत्तम वांढेकर यांच्या शेतात असलेल्या शेततळ्यात सध्या पाणीसाठा असून आज दुपारी या शेततळ्यात पोहण्यासाठी राजेंद्र वांढेकर यांचा मुलगा गणेश वांढेकर, श्रीकृष्ण मतकर व ज्ञानेश्वर तुकाराम वांढेकर हे तीघे गेले होते. गणेश वांढेकर यास पोहता येत होते तर श्रीकृष्ण मतकर यास पोहता येत नव्हते. हे तिघेही तरुण शेततळ्यात उतरल्यनंतर श्रीकृष्ण मतकर हा बुडायला लागला असता त्याच्या मदतीला गणेश वांढेकर गेला मात्र दोघेही पाण्यात बुडाले. या वेळी ज्ञानेश्वर वांढेकर याने आरडा ओरडा करून जवळच्या नागरिकांना बोलावले मात्र उपयोग झाला नाही. घटनेनंतर काही वेळातच बुडालेल्या दोन्ही तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने मोहोज खुर्द गावावर शोककळा पसरली आहे.