नातेवाईक क्वारंटाइन : संपर्कात आलेल्या 70 जणांचा शोध सुरू
पुणे/महर्षी नगर – गुलटेकडी परिसरामधील करोनाग्रस्त आढळलेल्या दोन व्यक्तींच्या नातेवाईकांना प्रशासनाने चौदा दिवसांसाठी क्वारंटाइन केले आहे. तर, या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या 70 जणांची यादी तयार करण्यात आली असून त्यांचाही शोध सुरू आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनाच क्वारंटाइन करण्यात यावे, अशी मागणी परिसरातून होत आहे.
गुलटेकडी परिसरात दोघे करोनाग्रस्त सापडल्याने खळबळ उडाली. प्रशासनाने तातडीने त्यांच्या नातेवाईकांनाही तपासणीसाठी नेले होते. यामध्ये नातेवाईकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. ही मंडळी घरी आल्यानंतर परिसरात घबराट पसरली. त्यांनी पोलीस प्रशासनाकडे या नातेवाईकांना सुद्धा क्वारंटाइन करावे अशी मागणी केली. त्यानंतर आज सकाळी या सर्व नातेवाईकांना रुग्णवाहिकेमघून पालिकेच्या क्वारंटाइन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या परिसरामध्ये हजारो संख्येने नागरिक राहतात. गरीब आणि कामगारांची ही वसाहत आहे. येथील घरे एकमेकांना चिटकून आहेत. त्यामुळे करोनाचा धोका आहे. सोमवारी या भागातील दोन जण करोनाबाधित आढळल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे, परिसरात असणाऱ्या खासगी डॉक्टरांनीही भीतीने आपले दवाखाने बंद ठेवले आहेत. परिसरात एखादा व्यक्ती साधा खोकलला तरी आता नागरिक चिंता व्यक्त करत आहेत. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रशासनाने सुद्धा तातडीने काही पावले उचलण्याची आवश्यकता होती, पण त्यांनी फारसे गांर्भीय घेतले नसल्याचे आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. पोलिसांव्यतिरिक्त याठिकाणी कोणीही अद्याप फिरकलेले नाही. संबंधित नातेवाईकही रात्रभर याच परिसरातच होते. त्याची आणखी भीती वाढली आहे.
इतक्या गंभीर प्रसंगात कोणतेही लोकप्रतिनिधी,आमदार विचारपूस करण्यास किंवा पाहणी करण्यास आलेले नाहीत. या परिसरात आता औषध फवारणी करण्यात येत आहे. मात्र संबंधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
– संतोष मोरे, स्थानिक नागरिक