पुणे – उपचाराअभावी कोणाचाही मृत्यू होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार प्रशासनास देत असतानाच, पालिकेच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील कोविड केअर सेंटरमध्ये दोन करोनाग्रस्तांचा अचानक मृत्यू झाला.
अप्पर इंदिरानगरमधील या दोन पुरुष मृतांचे वय अनुक्रमे 90 आणि 80 वर्षे आहे. तीन दिवसांपासून ते या सेंटरमध्ये उपचार घेत होते. तसेच त्यांना करोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. मात्र, शुक्रवारी दुपारी अचानक त्यांना श्वास घेण्यास त्रास झाला, त्यानंतर त्यांच्यावर पुढील उपचार सुरू करेपर्यंत या दोघांचा
मृत्यू झाला.
महापालिकेने काही दिवसांपूर्वीच हे कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. या भागात बिबवेवाडी परिसरातील हे दोन्ही बाधित होते. त्यांना, लक्षणे नसल्याने इतर रुग्णांसोबत या ठिकाणी वेगवेगळ्या खोल्यांमध्ये उपचारासाठी ठेवण्यात आले होते. मात्र, दुपारी अचानक त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. मात्र, काही वेळातच या दोन्ही रुग्णांचे प्राण गेले. त्यामुळे या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर तसेच वैद्यकीय कर्मचारीही भयभित झाले होते. त्यानंतर बराच वेळ या दोन्ही रुग्णांचे मृतदेह याच ठिकाणी पडून होते. काही काळानंतर महापालिकेच्या शिवाजीनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकाने या दोन्ही रुग्णांचे मृतदेह खोलीतून बाहेर काढून ते प्लॅस्टिकमध्ये गुंडाळून नेले. संध्याकाळी सहाच्या सुमारास या दोन्ही रुग्णांवर येरवडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
वैद्यकीय तपासणीवर प्रश्नचिन्ह?
महापालिकेने शहरात वेगवेगळ्या भागात सुरू केलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये आठ हजारांहून अधिक करोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यांना लक्षणे नसली तरी त्यांची नियमित तपासणी होणे अपेक्षित आहे. मात्र, अनेक केद्रांमध्ये दाखल करून घेतल्यानंतर तीन ते चार दिवस कोणीच तपासण्यास येत नसल्याच्या रुग्णांच्या तक्रारी आहेत. तर, या केंद्रामध्ये एक ते दीड हजार रुग्ण असल्याने तर डॉक्टर अवघे 3 ते 4 असल्याने प्रत्येकालाच तपासणी करणे शक्य होत नसल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. मात्र, या गोंधळात करोनाचे रुग्ण उपचारा अभावी अचानक गंभीर होऊन त्यांना आपला जीव गमवावा लागत असल्याचे या प्रकारामुळे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे.