सोलापूर – मार्कंडेय सहकारी रुग्णालय आवारात बुधवारी रात्री ऑक्सीजन सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात एकाचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
हनुमंत क्षीरसागर असे मृताचे नाव आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, हनुमंत क्षीरसागर हे नातेवाईकांना भेटण्यासाठी रुग्णालयात आले होते. पंरतु अचानक ऑक्सीजन सिलेंडरचा स्फोट झाला. यात त्यांचा मृत्यू झाला. त्यातच सुनिल लुंगारे या रुग्णाचा मृत्यू याच वेळी उपचार सुरु असताना झाला. मात्र, ऑक्सीजन सिलेंडर स्फोटाशी त्याचा संबंध नाही, अशी माहिती रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. माणिक गुर्रम यांनी दिली.
ते म्हणाले, हणुमंत क्षीरसागर हे रुग्णालयात उपचारासाठी नव्हे, नातेवाईकास भेटण्यास आले होते. ते हॉस्पिटल आवारात बेशुध्दावस्थेत आढळले. त्यांना आयसीयुमध्ये लगेचच उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. याबाबत पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह ताब्यात घेतला आहे.
दरम्यान मृतव्यक्तीच्या नातेवाईकांनी हॉस्पिटल व्यवस्थापनाचा हलगर्जीपणा कारणीभुत असल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करावा तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भुमिका सकाळी घेतली होती. आज सकाळी महापौर श्रीकांचना यन्नम यांनी अग्निशमनदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह हॉस्पिटल आवारात झालेल्या घटनास्थळाची पाहणी केली.