लसीकरणानंतर दोघांचा मृत्यू? आरोग्य मंत्रालयाने सांगितले मृत्यूचे खरे कारण

नवी दिल्ली – देशात करोना विरोधी लस देण्याची मोहीम शनिवारपासून सुरू झाली आहे. टप्प्याटप्प्याने ही लस दिली जाणार असून जुलैपर्यंत 30 कोटी नागरिकांना लस देण्याचा सरकारचा इरादा आहे. मात्र त्याच दरम्यान, लस घेतल्यानंतर देशात दोघांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या माध्यमांतून झळकल्या असल्यामुळे सरकारने म्हणजे आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

लस दिल्यामुळे ज्या दोघांचा मृत्यू झाला असल्याच्या बातम्या आहेत, त्या चुकीच्या आहेत. संबंधित दोघांचा मृत्यू हा कार्डियोपल्मोनरी नामक आजाराने झाला आहे. लसीकरणाशी त्याचा काहीही संबंध नाही.

रविवारी 52 वर्षीय महिपाल सिंह यांचा मृत्यू झाला होता. उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद जिल्ह्यात सरकारी रूग्णालयात ते वॉर्डबॉय म्हणून कार्यरत होते. करोनाविरोधी लस घेतल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर तीन डॉक्‍टरांच्या पथकाने त्यांचे पोस्टमॉर्टेम केले. त्याच्या अहवालानुसार कार्डियोपल्मोनरीमुळे महिपाल यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. आरोग्य मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव डॉ. मोहन अगनानी यांनी हा खुलासा केला आहे.

दुसरा मृत्यू कर्नाटकात झाल्याचे बातम्यांमध्ये म्हटले आहे.43 वर्षीय नागार्जून नावाचा हा व्यक्तीही बेल्लारी येथील सरकारी रूग्णालयात कामाला होता. नागार्जुनची जी उत्तरीय तपासणी करण्यात आली त्यातही कार्डियोपल्मोनरीचेच कारण देण्यात आले असल्याचे अगनानी यांचे म्हणणे आहे.

नागार्जून यांना उच्च दर्जाची आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत, असे बेल्लारीचे उपायुक्त पवन मालापट्टी यांनी नमूद केले. अन्य कोणत्याही आरोग्य कर्मचाऱ्याला लस दिल्यानंतर कोणताही त्रास झाला नसल्याचा दावाही त्यांनी केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.