नगर – करोनाबाधित महिलेने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. त्यानंतर त्या मातेचा दुसऱ्याच दिवशी मृत्यू झाला. बाळांचा जन्म होताच त्यांना मातेपासून अलग करण्यात आले होते. त्या दोन्ही बाळांचा करोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे, असे आरोग्य यंत्रणेने सांगितले आहे.
निंबळक येथील करोनाबाधित महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला होता. कृत्रिम गर्भधारणा केलेल्या या महिलेची मुदतपूर्व सिझेरियन करून प्रसूती करण्यात आली होती. जन्म होताच या मुलांना मातेपासून अलग करण्यात आले होते. त्यानंतर त्या बाळांचे घशातील स्त्राव चाचणीसाठी घेण्यात आले होते. त्याचा अहवाल शनिवारी सकाळी आला असून, ही दोन्ही बालके निगेटिव्ह असल्याचे आरोग्य यंत्रणेने सांगितले. या मुलांची रुग्णालयात सध्या डॉ. चेतना बहुरुपी काळजी घेत आहेत. मात्र, जिल्ह्यात एकाच दिवशी 13 जणांना करोनाची बाधा झाली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नगरकरांच्या चिंतेत भर पडली आहे.