पुणे: रात्रीच्या वेळी रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या टेम्पोमध्ये दरोडा टाकून 23 हजार रुपये आणि इतर साहित्य चोरून नेल्याप्रकरणात दोघांना विशेष मोक्का न्यायाधीश ए.एन.सिरसीकर यांनी 50 हजार रुपयांचा जामीन मंजुर केला. साक्षीदारांवर दबाब आणायचा नाही, महिन्याच्या पहिल्या शनिवारी हवेली पोलीस स्टेशनला हजेरी लावण्याच्या अटीवर हा आदेश देण्यात आला आहे.
तेजस दत्तात्रय भालेराव (वय 20, रा. कोथरूड) आणि मंगेश उर्फ मंग्या मारुती जोरी अशी त्या दोघांची नावे आहेत. त्यांनी ऍड. अजय ताकवणे, ऍड. अनिकेत जांभुळकर यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. फिर्यादी पुष्करसिंग पाल हे टेम्पोतून घर साहित्य घेऊन चालले होते. त्यावेळी टेम्पोचा चालक आणि फिर्यादींचा भाऊ त्यांच्याबरोबर होता. त्यांनी खडकवासला धरणाजवळ रस्त्याच्या बाजूला गाडी थांबविली होती. त्यावेळी दोघांनी पाणी है क्या, असे म्हणत फिर्यादी आणि टेम्पो चालकास चाकुने मारहाण करून लुटले. या प्रकरणात अटक केलेल्या या दोघांवर मोक्का लावण्यात आला होता. पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. दोघे आरोपी गेली 15 महिन्यापासून तुरूंगात आहेत. फिर्यादीच्या जबाबात विसंगती आहे. तसेच आरोपींची ओळख परेड घेतलेली नसून, एफआयआरमध्ये दोघांची नावे नाहीत. त्यामुळे त्यांना जामीन देण्याची मागणी बचाव पक्षातर्फे ऍड. अजय ताकवणे आणि ऍड. अनिकेत जांभुळकर यांनी केली.