ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेकडील “पपुआ न्यु गिनी’ फाळणीच्या उंबरठ्यावर
स्वप्निल श्रोत्री/पुणे: गेले काही दिवस पॅसिफिक महासागरात ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेला असलेले “पपुआ न्यु गिनी ‘ हे राष्ट्र आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये चर्चेचा विषय बनले आहे. आजपर्यंत कोणाच्याही खिजगणतीत नसलेले “पपुआ न्यु गिनी ‘ हे राष्ट्र अचानक प्रकाश झोतात आले, ते ह्या देशाच्या होणाऱ्या फाळणीमुळे. नुकत्याच झालेल्या एका जनमत चाचणीवेळी बोगनविल्लेच्या नागरिकांनी स्वतंत्र देशाच्या बाजूने निश्चित कौल दिला असला तरीही स्वतंत्र देश मिळाल्यावर त्याची राजव्यवस्था कशी असेल यावर अभ्यास आणि चर्चा अजूनही झालेली नाही.
पपुआ न्यु गिनी च्या पूर्वेला असलेल्या बोगनविल्ले ह्या बेटावरील नागरिकांचा गेली अनेक वर्षे पपुआ न्यु गिनी पासून वेगळे होण्यासाठी लढा सुरू होता. सुरुवातीच्या काळात शांततामय सुरू असलेला नागरिकांचा हा लढा पुढे हिंसक आणि सशस्त्र बनला. परिणामी, देशातील शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या हेतूने पपुआ न्यु गिनीच्या तत्कालीन सरकारने वर्ष 2001 मध्ये बोगनविल्ले ह्या बेटावरील नागरिकांशी शांततेचा करार केला. या करारानुसार योग्य वेळ आल्यावर पपुआ न्यु गिनीचे सरकार बोगनविल्लेमध्ये मतदान घेईल आणि त्यावरून ठरविण्यात येईल की बोगनविल हा नव्याने देश बनेल की नाही. गेल्याच आठवड्यात पपुआ न्यु गिनी सरकारने बोगनविल्लेमध्ये मतदान घेतले होते आणि त्याच्या निकालानुसार 98% नागरिकांनी बोगनविल्लेच्या बाजूने स्वातंत्र्याच्या बाजूने कौल दिला त्यामुळे पुढील काही दिवसात पृथ्वीवर बोगनविल्ले नावाचे एक नवे 194 वे राष्ट्र जन्माला येणार आहे.
दरम्यान, बोगनविल्ले संदर्भात तीन प्रमुख प्रश्न उपस्थित होतात. पहिला म्हणजे पपुआ न्यु गिनीचे नागरिक बोगनविल ह्या नव्या राष्ट्राला मान्यता देतील का? सध्या बोगनविल्लेच्या स्वातंत्र्याचा विषय हा पपुआ न्यु गिनी च्या संसदेसमोर येणार असून त्यावर चर्चा होणे अपेक्षित आहे आणि अपेक्षेनुसार पपुआ न्यु गिनी च्या संसदेत घमासान सुद्धा होईल. परंतु, 98% नागरिकांनी दिलेला कल व वर्ष 2001 मध्ये तत्कालीन सरकारने केलेला करार ह्यामुळे पपुआ न्यु गिनीचे सरकार आणि संसदेवर बोगनविल ह्या नव्या राष्ट्रास मान्यता देण्या खेरीज दुसरा मार्ग समोर नसेल.
कसा असेल नवा देश?
बोगनविल्लेचे क्षेत्रफळ 9,138 चौरस किलोमीटर असून 2,34,000 च्या आसपास लोकसंख्या आहे. लोकसंख्येची घनता ही प्रतिचौरस किलोमीटर 18 इतकी आहे. नारळ, मत्स्य व्यवसाय आणि पर्यटन हे इथले मुख्य कमाईचे स्रोत आहेत. आर्थिक विकास दर कमी, नैसर्गिक साधनसंपत्तीची वाणवा आणि गरिबी ही या देशासमोरची मुख्य आव्हाने असतील. भविष्यात पपुआ न्यु गिनी आणि बोगनविल्ले ह्या दोन राष्ट्रांचे संबंध कसे असतील? भारत-पाकिस्तान, इस्राईल-पॅलेस्टिन, उत्तर कोरिया-दक्षिण कोरियाप्रमाणे इथे वाद तर होणार नाहीत ना?