विज्ञानविश्‍व: बोरिसॉव आणि हौशी खगोलनिरीक्षक

डॉ. मेघश्री दळवी
या वर्षीची 29 ऑगस्टची रात्र. गेनाडी बोरिसॉव हा हौशी खगोलनिरीक्षक क्रिमियामधल्या आपल्या घरातून आकाशनिरीक्षण करत होता. त्याला एक नवी चमकदार हलती वस्तू दिसली. नियमितपणे निरीक्षण करत असल्याने या वस्तूची दिशा इतर अशनींसारखी नाही हे त्याच्या लगेच लक्षात आलं. त्याने त्या वस्तूच्या निर्देशांकाचं मोजमाप करून ते डेटाबेसशी ताडून पाहिलं, ती नक्‍की कोणती वस्तू असावी यासाठी. आणि काय आश्‍चर्य! ही एक संपूर्णपणे नवी खगोलीय वस्तू होती. कधीच नोंद न झालेली. बोरिसॉव चकीत झाला, त्याने पुन्हा एकदा पडताळून पाहिलं, अशनी असेल तर पृथ्वीवर आदळण्याचा धोका आहे का, ही आकडेमोड केली आणि मग हा सगळा डेटा खगोलनिरीक्षकांच्या एका वेबपेजवर पोस्ट केला. ही वस्तू बहुधा एक धूमकेतू असावा असा अंदाजही त्याने मांडला.

पूर्ण अभ्यासानंतर 24 सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय खगोलीय संघाने, इंटरनॅशनल ऍस्ट्रोनॉटमिकल युनियनने ही वस्तू म्हणजे खरोखरच एक नवा धूमकेतू असल्याचं घोषित केलं. आणि हा धूमकेतू साधासुधा नाही, तर तो आहे इंटरस्टेलर, म्हणजेच आपल्या सूर्यमालेच्या बाहेरून आलेला. माणसाने नोंदलेला हा पहिला इंटरस्टेलर धूमकेतू आहे, आणि त्याला बोरिसॉवचं नाव देण्यात आलं आहे. दोन वर्षांपूर्वी ओमुआमुआ ही आपण पाहिलेली पहिलीच इंटरस्टेलर चीज होती. ही घटना अतिशय थरारक होती. तिच्या निरीक्षणाला आपल्याला जास्त काळ मिळाला नाही.

पण त्या तुटपुंज्या निरीक्षणाने तर्कांना मात्र उधाण आलं. आता बोरिसॉवया इंटरस्टेलर धूमकेतूचा छडा लवकर लागल्याने खगोलशास्त्रज्ञांना निरीक्षणाला भरपूर मोठी संधी आहे. तासाला दीड लाख किलोमीटर वेगाने प्रवास करणारा हा धूमकेतू आपल्या जवळ येतो आहे. किमान सप्टेंबर 2020 पर्यंत त्याचा माग घेता येईल आणि आजवर कधीही न मिळालेली अतिशय मौल्यवान माहिती त्यातून हाती येईल. विश्‍वाचं गूढ उकलण्याची ही अतुलनीय संधी मिळाली आहे एका हौशी खगोलनिरीक्षकामुळे!

जगभरात अनेक खगोलशास्त्रीय संस्था असतील, तऱ्हेतऱ्हेच्या प्रचंड दुर्बीणी असतील, सोबत अत्याधुनिक तंत्रज्ञान असेल, तरी कित्येकजण आवडीने दुर्बीण घेऊन आकाशनिरीक्षण करत असतात. गेली शंभर वर्षे या मंडळींमुळे अनेक खगोलीय शोध लागले आहेत. अवकाशाचा वेध घेणं हे एकट्या-दुकट्याचं काम नाही. त्यामुळे ही मंडळी सतत माहिती शेअर करत असतात, प्रकल्पांवर एकत्र काम करत असतात. उदाहरणार्थ, टी उर्सा मायनरीस या ताऱ्याचा वेध असे हौशी निरीक्षक गेली शंभर वर्षे घेत आहेत. त्याच्या तेजाचं मोजमाप, आणि कमीजास्त होत राहाण्याचं प्रमाण त्यांनी काटेकोरपणे शतकभर नोंदून ठेवलं आहे.

हौशी खगोलीय अभ्यासाची शंभर वर्षे साजरी करण्यासाठी यावर्षी एप्रिलमध्ये अशा खगोलनिरीक्षकांची पहिली परिषद बेल्जियममध्ये भरली होती. आणि बोरिसॉव या इंटरस्टेलर धूमकेतूचा शोध लावून गेनाडी बोरिसॉवने या शतकपूर्तीला अगदी योग्य मानवंदना दिली आहे!

Leave A Reply

Your email address will not be published.