लंडन : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन उद्या (सोमवार) पासून आपल्या नियमित कामाला सुरुवात करणार आहेत. डाउनिंग स्ट्रीटच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला जॉन्सन यांना करोनाची लागण झाली होती. उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि तीन दिवस त्यांना अतिदक्षता विभागामध्ये ठेवण्यात आले होते.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे ब्रिटनमध्ये सध्या लॉकडाऊन आहे. करोनाची लागण झाल्यामुळे ब्रिटनमध्ये आतापर्यंत 20 हजारांपेक्षा अधिक व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद असल्यामुळे ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेपुढे मंदीचे सावट आहे. या आव्हानाचा मुकाबला जॉन्सन यांना करायचा आहे.
करोना टेस्ट किट मर्यादित प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे करोनाच्या चाचण्या फार कमी प्रमाणात घेतल्या जात आहेत. तसेच डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठीही आरोग्य रक्षक उपकरणेही मर्यादित प्रमाणात उपलब्ध होत असल्यामुळे ब्रिटन सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका केली जात आहे. करोनाच्या संसर्गाच्या दुसऱ्या टप्प्यात सरकार लॉकडाऊनला शिथिल कसे करू शकेल, अशी प्रश्नांची सरबत्ती जॉन्सन यांचे प्रभारी डॉमनिक राब यांच्यावर केली गेली होती. सध्याच्या लॉकडाऊनमध्ये सवलती दिल्या जाव्यात अशी मागणी काही खासदारांकडून केली जात आहे.