लंडन – लंडनचे माजी महापौर बोरिस जॉन्सन ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. बोरिस जॉन्सन हे ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांची जागा घेतील. ब्रेक्झिटनंतर थेरेसा मे यांनी 7 जून रोजी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता.
ब्रिटनच्या पंतप्रधान पदासाठी आणि सत्तारूढ कंझर्वेटीव्ह पार्टीच्या नेतेपदासाठी सोमवारी निवड प्रक्रिया पार पडली. यामध्ये पक्षाच्या 1 लाख 60 हजार कार्यकर्त्यांनी बॅलेट पेपरद्वारे मतदान केले.
मतदान प्रक्रियेदरम्यान, जॉन्सन यांचे नाव आघाडीवर होते. दरम्यान, थेरेसा मे यांच्या सरकारमधील परराष्ट्र मंत्री ऍलन डंकन यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. तर, रविवारी अर्थमंत्री फिलिप हॅमंड यांनीही जॉन्सन पंतप्रधानपदी विराजमान झाल्यास आपण आपल्या पदाजा राजीनामा देऊ, असा इशारा दिला होता. नव्या पंतप्रधान पदाच्या निवडीपर्यंत थेरेसा मे या पंतप्रधानपदी कार्यरत राहणार आहेत.
दरम्यान, मंगळवारी त्यांनी मंत्रिमंडळाची अखेरची बैठक घेतली. त्यानंतर राणी एलिझाबेथ यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवला. जॉन्सन हे बुधवारी पंतप्रधान पदाची शपथ घेतील. यापूर्वी त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाचा कार्यभारही सांभाळला आहे.