करोना विषाणूच्या संसर्गामुळे सध्या कुटुंबातील सर्वच सदस्य घरात आहेत. करोना विषाणूपासून आपल्याला स्वत:ची सुटका करून घ्यायची असेल तर मात्र घरात राहणे आवश्यकच आहे. मात्र, अशावेळी दिवसाचे 12 ते 14 तास वेळ कसा घालवायचा असा प्रश्न अनेकांपुढे निर्माण झाला असेल. तर अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामध्ये तुम्ही स्वत:चा आणि कुटुंबीयांच्या वेळाचे अतिशय उत्तमरीत्या नियोजन करू शकता. यासाठी कुटुंबातील प्रत्येकाची साथ आणि उत्साह मात्र आवश्यक आहे. पाहूयात घरात बसून तुम्ही अशा कोणत्या गोष्टी करू शकता. यामुळे आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य दोन्हीही उत्तम राहण्यास निश्चितच मदत होईल.
घरातील कपाटे किंवा पोटमाळे यांमध्ये आपण वर्षानुवर्षाच्या असंख्य गोष्टी साठवून ठेवलेल्या असतात. वेळ होईल तेव्हा आवरू म्हणून ठेवलेल्या या गोष्टी तुम्ही घरातील सर्वांच्या मदतीने आवरू शकता. यामुळे घरातील न लागणारे सामान नकळत घराबाहेर जायला मदत होईल आणि एखादी गरजेची अनेक दिवसांपासून न सापडणारी वस्तू अगदी सहज मिळून जाईल.
जुने फोटो अल्बम किंवा घरातील सदस्यांच्या लग्नाच्या किंवा इतर कार्यक्रमाच्या सीडी पाहणे ही गोष्टी वेळ नसल्याने अनेक वर्ष काहीशी मागे पडलेली असते. पण आता सगळे सदस्य घरात असताना तुम्ही एकत्रितपणे फोटो अल्बम पाहणे किंवा सीडी पाहणे असा कार्यक्रम नक्की करू शकता. यामुळे नकळत जुन्या आठवणींना उजाळा मिळण्यास मदत होते.
टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे हे या मोकळ्या वेळात करता येण्यासारखे आणखी एक चांगले काम असू शकते. आपल्या घरात न लागणाऱ्या मात्र फेकूनही देता येत नाहीत अशा असंख्य वस्तू असतात. या वस्तूंपासून आपल्याला घर सजविण्यासाठी काही आकर्षक वस्तू नक्की तयार करता येऊ शकतात. नेमके काय किंवा कसे करावे हे समजत नसेल तर युट्यूबवर यासाठीचे अनेक व्हिडीओज उपलब्ध आहेत.
मोकळा वेळ असल्याने पर्यावरणाच्यादृष्टीने काही गोष्टी करणे शक्य आहे. यामध्ये घरच्या घरी कुंडीत झाडे लावणे, आधीपासून झाडे असतील तर त्यांना ओला कचरा घालून त्यांची योग्य पद्धतीने देखभाल करणे शक्य आहे. बाहेर उन्हाचा तडाखा वाढत असल्याने पक्ष्यांना अन्न व पाणी मिळण्यास अनेक अडचणी येतात. अशावेळी आपण घराच्या गॅलरीमध्ये किंवा खिडकीत पक्ष्यांसाठी पाणी व अन्नाची सोय अगदी सहज करू शकतो.
आपल्या कुटुंबात प्रत्येक व्यक्तीकडे काही ना काही कला किंवा ज्ञान असते. या ज्ञानाचा उपयोग ती व्यक्ती छंद म्हणून किंवा अर्थार्जनासाठी करत असते. मात्र, प्रत्येकाकडून त्याला येत असणारी गोष्ट कुटुंबातील प्रत्येकाने शिकण्याचा प्रयत्न केल्यास एक वेगळा अनुभव नक्कीच येऊ शकतो. यामध्ये एखादे वाद्य एकमेकांना शिकवणे, कला शिकवणे, आपण घेतलेल्या शिक्षणाशी निगडित काही गोष्टी शिकवणे, घरातील ज्येष्ठांकडून त्यांना आलेले अनुभव ऐकणे इ. गोष्टींचा समावेश होऊ शकतो.
वाचन, लिखाण, संगीत ऐकणे, एकत्रित घरच्या घरी एखादा सिनेमा पाहणे, घरातील एखादी भिंत उपलब्ध साहित्यातून रंगवणे, एखादा कोपरा सजवणे अशा एक ना अनेक गोष्टी एकमेकांसोबत आपण करू शकतो.
काळाच्या ओघात मागे पडलेले बुद्धिबळ, पत्ते, आठ-चाळीस, फुली गोळा असे लहान मोठे खेळही आपला वेळ चांगल्या पद्धतीने घालविण्यास महत्त्वाचे माध्यम ठरू शकतात. घरातील कामे केवळ स्त्रीने न करता प्रत्येकाने त्याला हातभार लावल्यास स्त्रिला काही प्रमाणात आराम मिळतो आणि कुटुंबातील सदस्यांचा वेळ जाण्यासही चांगल्या तऱ्हेने मदत होऊ शकते.
एरवी रोजच्या धावपळीत व्यायामाला वेळ नाही असे कारण आपल्यातील अनेक जण सर्रास देत असतात. पण आता अनायसे हातात मोकळा वेळ आहे तर दररोज न चुकता घरच्या घरी व्यायाम करता येऊ शकतो. यामध्ये योगासने, सूर्यनमस्कार, प्राणायाम, ध्यान, सोसायटीच्या खाली जागा असल्यास अथवा घरातल्या घरात चालणे इ. गोष्टी अगदी सहज करता येतील त्यामुळे आरोग्य उत्तम राहण्यास चालून आलेली संधी म्हणून याकडे आपण पाहू शकतो.
रोज आपल्याला वेगवेगळे पदार्थ बनवायला वेळ नसतो, त्यामुळे आपण घाईगडबडीत जे पटकन होईल ते करतो. पण आता हातात वेळ आहे तर घरच्या घरी अनेक सोपे आणि चविष्ट पदार्थ आपण नक्की करू शकतो. त्यामुळे आपला वेळ जाण्यास तर मदत होईलच पण कुटुंबातील सदस्यही वेगळे काहीतरी खायला मिळाल्याने नकळत खूश होतील.