पुणे – दरवर्षी पावसाळ्यामध्ये दरड कोसळून रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम होतो. परंतु, यंदा मध्य रेल्वेने पूर्वतयारी केली असून, हिल गॅंगने बोर घाट आणि थल घाटातील सुमारे 600हून अधिक सैल झालेल्या दरडी शोधून त्या हटवल्या, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.
मध्य रेल्वेच्या बोर घाट (कर्जत आणि खंडाळा दरम्यान) आणि थल घाटातील (कसारा आणि इगतपुरीदरम्यान) हिल गॅंगने त्यांच्या “रॉक क्लायंबिंग’ आणि “माउंटन रॅपलिंग’ ही कौशल्ये वापरून दरड कोसळण्याला प्रतिबंध घालण्यासाठी आव्हानात्मक काम पूर्ण केले.
हिल गॅंगचे सदस्य रेल्वे रुळांलगतचे डोंगर चढून सैल आणि धोकादायक दरडी हटवण्याचे काम करतात. यावर्षी केवळ बोर घाट आणि थल घाटात सैल आणि धोकादायक दरडी शोधण्यात आल्या. एप्रिल आणि मे महिन्यात दररोज 4 ते 5 तासांचा ब्लॉक घेऊन असे चिन्हांकित सैल आणि असुरक्षित दरड पाडण्यात आल्या. 3 वॅगनच्या विशेष गाडीने दररोज 4 ते 5 तासांचा ब्लॉक घेत 60 दिवसांत हे काम पूर्ण करण्यात आले. दोन्ही घाटांमध्ये दहा हिल गॅंगने हे काम केले.