Australia vs India 1st Test : पर्थ येथील ऑप्टस स्टेडियमवर सोमवारी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या (Border Gavaskar Trophy 2024/25) पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव करून भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. यशस्वी जैस्वाल आणि विराट कोहलीच्या शतकी खेळीच्या जोरावर पाहुण्या संघाने तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियासमोर 534 धावांचे लक्ष्य ठेवले होते, परंतु प्रत्युत्तरात कांगारू संघ दुसऱ्या डावात 238 धावांवर गारद झाला. आशियाबाहेर धावांच्या बाबतीत टीम इंडियाचा कसोटीमधला हा दुसरा सर्वात मोठा विजय आहे. सामन्यात एकूण 8 विकेट घेऊन कांगारूंच्या फलंदाजांचे कंबरडे मोडणाऱ्या जसप्रीत बुमराहला सामनावीराचा किताब देण्यात आला.
𝗪𝗛𝗔𝗧. 𝗔. 𝗪𝗜𝗡! 👏 👏
A dominating performance by #TeamIndia to seal a 295-run victory in Perth to take a 1-0 lead in the series! 💪 💪
This is India’s biggest Test win (by runs) in Australia. 🔝
Scorecard ▶️ https://t.co/gTqS3UPruo#AUSvIND pic.twitter.com/Kx0Hv79dOU
— BCCI (@BCCI) November 25, 2024
या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा पहिल्या डाव केवळ 150 धावांवर आटोपला. त्यानंतर यजमान ऑस्ट्रेलिया हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते, पण बुमराहने आपल्या करिष्माई गोलंदाजीने बाजी पलटवून टाकली. पहिल्या डावात बूम बूम बुमराहने 5 विकेट घेत ऑस्ट्रेलियाचा डाव अवघ्या 104 धावांत गुंडाळला. अशा प्रकारे भारतीय संघाने पहिल्या डावात 46 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली.
यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या डावात आश्चर्यकारक कामगिरी केली. प्रथम यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांनी 201 धावांची सलामी भागीदारी करून ऑस्ट्रेलियाचे मनोधैर्य तोडले आणि त्यानंतर विराट कोहलीने शतक झळकावून भारताचा विजय निश्चित केला. जैस्वालने 161 धावांची तर विराटने नाबाद 100 धावांची खेळी केली. तर केएल राहुलने 77 धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले. अशा प्रकारे भारताने दुसरा डाव 6 बाद 487 धावांवर घोषित केला आणि ऑस्ट्रेलियाला 534 धावांचे मोठे लक्ष्य दिले.
प्रत्युत्तरात कांगारूचा दुसरा डाव 238 धावांवर गडगडला आणि भारताने 295 धावांनी सामना जिंकला. ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात ट्रॅव्हिस हेडने सर्वाधिक 89 धावा केल्या. याशिवाय मिचेल मार्शने 47 धावांची तर यष्टिरक्षक ॲलेक्स कॅरीने 36 धावांची खेळी खेळली. मात्र, या फलंदाजांच्या खेळीमुळे फक्त पराभवाचे अंतर कमी होऊ शकले आणि भारतानं पर्थ कसोटी चौथ्या दिवशीच जिंकली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या डावात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (03) आणि मोहम्मद सिराज(03) यांनी मिळून सहा विकेट घेतल्या. त्यांच्याशिवाय फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरने दोन तर नवोदित नितीश कुमार रेड्डी आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
ऑप्टस स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाचा पहिल्यांदाच पराभव
जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने विजय मिळवल्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाला नवीन पर्थ स्टेडियमवर झालेल्या कसोटीत प्रथमच पराभवाला सामोरे जावे लागले. सोमवारपूर्वी, ऑस्ट्रेलियाने पर्थमध्ये भारत, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानविरुद्धचे चारही कसोटी सामने जिंकले होते. तथापि, 2018 पासून ऑप्टस स्टेडियमवर सामने खेळण्यास सुरुवात झाली. पर्थ (WACA, 2008), ॲडलेड (2008), Gabba (2021) आणि आता पर्थ (Optus)… भारताने ऑस्ट्रेलियात काही ऐतिहासिक सामने जिंकले आहेत.
ऑस्ट्रेलियात सर्वात मोठा विजय…
ऑस्ट्रेलियात धावांच्या फरकाने भारताचा हा सर्वात मोठा विजय आहे. हा सामना 295 धावांनी जिंकण्यापूर्वी भारताने 1977 मध्ये मेलबर्नमध्ये 222 धावांनी विजय मिळवला होता. त्याच वेळी, 2018 मध्ये मेलबर्नमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा 137 धावांनी पराभव केला होता. घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध 0-3 असा क्लीन स्वीप केल्यानंतर भारतीय संघाचे हे पुनरागमन विशेष आहे.
IND vs AUS 1st Test : शतकी खेळीसह ‘यशस्वी जैस्वाल’ने रचला इतिहास, ‘या’बाबतीत साधली सचिनशी बरोबरी…
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) आशाही जिवंत…
या विजयासह भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) आशाही जिवंत ठेवल्या आहेत. अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला आता आणखी तीन सामने जिंकावे लागणार आहेत. पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करून भारताने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. त्याच्या गुणांची टक्केवारीही 58.33 वरून 61.11 वर सुधारली आहे. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाची 13 सामन्यांतील चौथ्या पराभवासह दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. त्यांच्या गुणांची टक्केवारी 57.69 इतकी आहे. भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी ही मालिका 4-0 ने मालिका जिंकावी लागणार आहे. पहिला सामना जिंकल्यानंतर संघाला आता आणखी तीन सामने जिंकावे लागणार आहेत. भारताचा 15 सामन्यांमधला हा नववा विजय आहे. आता त्याच्या खात्यात 110 गुण आहेत. श्रीलंका 55.56 गुणांच्या टक्केवारीसह तिसऱ्या स्थानावर आहे, तर न्यूझीलंड (54.55) आणि दक्षिण आफ्रिका (54.17) अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहे.