Border-Gavaskar Trophy 2024/25 (Mohammed Shami) – घोट्याच्या दुखण्यामुळे गेल्या वर्षभरापासून आंतरराष्ट्रीय संघाचा सदस्य नसलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या सय्यद मुश्ताक अली टी-20 करंडक स्पर्धेत दमदार कामगिरी करत आहे. त्यामुळे लवकरच त्याचा समावेश भारतीय संघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे तो सध्या सुरु असलेल्या बॉर्डर-गावस्कर करंडक मालिकेतून पुन्हा एकदा भारतीय संघाचा भाग होऊ शकतो. शमी भारतीय संघात सामील झाल्यास नक्कीच भारताच्या वेगवान गोलंदाजीला अजून धार मिळू शकते.
बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडून शमी तंदुरुस्त असल्याच्या प्रमाणपत्राची वाट पाहत आहेत. एकदा शमीला एनसीएकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला की, शमी उर्वरित कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होवू शकतो. शमीला पाठविण्यासाठी बीसीसीआयची तयारी पूर्ण झाली असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. मोहम्मद शमीचा ऑस्ट्रेलियाचा व्हिसा देखील तयार आहे. त्यामुळे तंदुरुस्ती प्रमाणपत्र मिळताच शमी ऑस्ट्रेलियासाठी रवाना होणार आहे.
शमी सध्या सय्यद मुश्ताक अली टी-२० करंडक स्पर्धेत बंगाल संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. उप-उपांत्यपूर्व फेरीत चंदीगडविरुद्ध बंगाल संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. आम्ही या लढतीत विजयी होवून उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र झालो, तरी शमी संघासोबत असेल की नाही हे सांगता येणार नाही. तो तंदुरुस्त आहे त्यामुळे कदाचित त्याचा समावेश शेवटच्या दोन कसोटींसाठी होवू शकतो, असे बंगाल संघाचे मुख्य प्रशिक्षक लक्ष्मीरतन शुक्ला यांनी सांगितले.
IND vs AUS 2nd Test : दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियावर दणदणीत विजय; मालिकेत साधली बरोबरी..
शमीमुळे बुमराहचा दबाव कमी होईल…
सध्याच्या घडीला बुमराह व सिराज वगळता इतर गोलंदाज हे नवखे आहेत. त्यामुळे बुमराहला गोलंदाजीची धुरा सातत्याने खांद्यावर घ्यावी लागत आहे. त्यामुळे “मोहम्मद शमी जितक्या लवकर येथे पोहोचेल तितके भारतासाठी चांगले होईल,” असे शास्त्री येथे दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ‘समालोचन’ करताना म्हणाले. जेव्हा बुमराह गोलंदाजी करत असतो आणि इतर गोलंदाजी करत असतात, तेव्हा तुम्ही विरोधी संघातील खेळाडूंवर दडपण पाहू शकता, असे ते बोलताना म्हणाले.