Border–Gavaskar Trophy 2024-25 :- आगामी बॉर्डर गावस्कर मालिकेला २२ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असून या मालिकेसाठी भारताचा चमू ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाला. पहिल्या लढतीत नियमित कर्णधार रोहित शर्मा खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे, अशा वेळी कर्णधारपदाची जबाबदारी जसप्रीत बुमराहकडे असेल असे भारतीय राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी स्पष्ट केले.
सोमवारी भारतीय संघाची दुसरी तुकडी ऑस्ट्रेलियाला रवाना झाली. मात्र भारतीय कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्मा या तुकडीसोबत गेलेला नाही. त्यामुळे तो पहिल्या कसोटीत खेळणार कि नाही, याबाबत अजूनही स्पष्टता नाही. त्यामुळे यावर भाष्य करताना प्रशिक्षक म्हणाले की, यासंदर्भात कोणतेही भाष्य आता करणार नसलो तरी तो या कसोटीसाठी उपलब्ध होईल, अशी आशा आहे. मात्र तो उपलब्ध झालाच नाही तर, सध्या वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह भारताचा उपकर्णधार असल्याने, संघाचे नेतृत्व तोच करेल, असे गंभीर बोलताना म्हणाले.
अपयशी लोकेश राहुलची पुन्हा पाठराखण
अभिमन्यू ईश्वरन व लोकेश राहुल हे आधीपासूनच ऑस्ट्रेलियामध्ये आहेत. या दोघांनीही ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या अनधिकृत कसोटीमध्ये सहभाग घेतला होता. या संदर्भात बोलताना गंभीर म्हणाला, आमच्याकडे अनेक पर्याय उपलब्ध आहे. आम्ही पहिल्या सामन्यात सर्वोत्तम ११ खेळाडू मैदानात उतरविणार आहोत. लोकेश राहुल व ईश्वरन यांच्यापैकी राहुलकडे अनुभव जास्त असल्याचे सांगताना त्यांनी राहुल अंतिम ११ मध्ये असल्याचे संकेत दिले. गंबीर बोलताना म्हणाले की, कधी कधी तुम्ही अनुभवी खेळाडूंवर विश्वास दाखविता. राहुलकडे वरच्या क्रमांकावर, तिसऱ्या क्रमांकावर आणि सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची क्षमता आहे, असे म्हणत गंभीरने पुन्हा लोकेश राहुलची पाठराखण केली.
🗣️ We are absolutely keen to go out there, perform, and try and win the series
Head Coach Gautam Gambhir ahead of #TeamIndia‘s departure to Australia for the Border-Gavaskar Trophy.#AUSvIND | @GautamGambhir pic.twitter.com/MabCwkSPGL
— BCCI (@BCCI) November 11, 2024
तो यष्टिरक्षण देखील करू शकतो
लोकेश राहुलने यापूर्वी यष्टीरक्षण देखील केले आहे. तो सलामीला, मधल्या फळीत व सहाव्या स्थानावर देखील फलंदाजी करू शकतो. गंबीर म्हणाला की, किती खेळाडूं आहेत, कि जे अशा प्रकारची भूमिका निभावू शकतात? आम्हाला गरज पडल्यास तो आमच्यासाठी यष्टीरक्षणाचे देखील काम करू शकतो असे म्हणताना गंभीर यांनी संघातील लोकेश राहुलचे संघातील स्थान पुन्हा एकदा अधोरेखित केले.
शार्दूलची निवड का नाही ?
आकड्यांचा मागोवा घेतला असता, अष्टपैलू शार्दूल ठाकूरची आकडेवारी, संघात स्थान मिळालेल्या नितीशकुमार रेड्डीपेक्षा चांगली आहे. प्रथम श्रेणीमध्ये रेड्डीची सरासरी २१ आहे. शार्दूलकडे अनुभव असून देखील, त्याला संघात स्थान मिळाले नाही. गतमालिकेत शार्दूल गाबा येथे भारताला विजय मिळवून दिला होता. त्याने गोलंदाजीत बळी टिपण्याच्या बरोबरीने फलंदाजीत देखील अर्धशतके केली होती. गंबीर म्हणाला, मला वाटते की, हा सर्वोत्तम खेळाडूंचा संघ आहे, ज्याला देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडले आहे. नितीश हा प्रतिभावान खेळाडू आहे. त्याला संधी मिळाली तर नक्कीच तो संघासाठी महत्वाचा दुवा ठरणार आहे.
आमच्याकडे नवा मात्र आक्रमक वेगवान मारा
गेल्या वेळी भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने भन्नाट गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना धावासाठी झगडविले होते. मात्र, सध्याच्या घडीला शमी संघात नाही. त्यामुळे सर्व भार उपकर्णधार जसप्रीत बुमराहवर असणार आहे. यावेळी संघात असणारे वेगवान गोलंदाज हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा व आकाशदीप यांच्याकडे अनुभवाची कमतरता आहे. आमच्याकडे गुणवत्ता आहे. प्रसिद्ध कृष्णा व हर्षीत राणा यांच्यासारखे उंच गोलंदाज खेळपट्टीचा चांगला वापर करू शकतात. आमच्याकडे असलेल्या सर्वच गोलंदाजांकडे वेगवेगळी कौशल्ये आहेत, ज्यामुळे आमचा वेगवान मारा शक्तिशाली होतो, असे गंभीर बोलताना म्हणाले.
वातावरणाशी जुळवून घेणे महत्वाचे..
बॉर्डर गावस्कर मालिकेच्या आधी साधारण १० दिवस भारतीय संघ ऑस्ट्रेलियात दाखल होणार आहे. यामुळे खेळाडूंना तेथील परिस्थितीशी जुळवून घेण्यास मदत मिळणार असल्याचे प्रशिक्षक गंभीर यांनी बोलताना सांगितले. ते म्हणाले, आमच्याकडे अनेक अनुभवी खेळाडू असून त्यांनी यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. त्यांचा अनुभव युवा खेळाडूंना नक्की फायदेशीर ठरणार आहे. या १० दिवसांमध्ये हे खेळाडू तयार होऊन परिस्थितीशी जुळवून घेतील, अशी आशा गंभीर यांनी व्यक्त केली.