सिडनी – न्यूझीलंडने भारताला एकतर्फी पराभूत केले. तब्बल ३६ वर्षाच्या कालखंडानंतर भारताला मायदेशात पूर्ण मालिका गमवावी लागली. या पराभवामुळे भारतीय खेळाडूंच्या मानसिकतेला धक्का बसला असला तरी, आगामी २२ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर मालिकेत भारताला सहज पराभूत करता येऊ शकेल, असा विचार करणे धाडसाचे ठरेल, असे मत ऑस्ट्रेलियाचे संघाचे दिग्गज खेळाडू ॲडम गिलख्रिस्ट आणि डेव्हिड वॉर्नर यांनी व्यक्त केले.
न्यूझीलंड संघाने भारताचा ३-० असा कसोटी इतिहासातील सर्वात मोठा पराभव केला. या मालिकेपूर्वी भारतीय संघ विश्व कसोटी मालिकेत अव्वल स्थानी होती. मात्र सलग तीन पराभवानंतर ऑस्ट्रेलिया आता विश्व कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी गेला असून भारत दुसऱ्या स्थानावर आहे. या मालिका पराभवामुळे विश्वकरंडक कसोटीच्या अंतिम फेरीत दाखल होण्यासाठी देखील मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
फॉक्स स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये ॲडम गिलख्रिस्ट बोलताना म्हणाला की, भारतीय संघाला नुकताच पराभवाचा धक्का बसला असला तरी त्यांना सहज पराभूत करता येईल, असे मला वाटत नाही. या धक्क्यातून सावरण्याची त्यांची क्षमता असून, ते नक्कीच पुनरागमन करतील. भारतीय संघात काही दर्जेदार वरिष्ठ खेळाडू असून ते हे आव्हान कशा प्रकारे हाताळतात हे पहाणे रंजक ठरणार असल्याचे त्याने बोलताना सांगितले.
वॉर्नर म्हणाला….
भारताकडे जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज व फिरकीपटू अश्विन असा ताफा असताना देखील त्यांना न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत पराभव स्वीकारावा लागला. भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह व मोहम्मद सिराज यांचा सामना आमचे फलंदाज कसा करतात, यावर ऑस्ट्रेलिया संघाचे यश अवलंबून आहे. आघाडीच्या फळीने त्यांच्या विरुद्ध चांगली फलंदाजी केली तर मोठी धावसंख्या उभारता येऊ शकेल. यासाठी आम्हाला पूर्ण ताकदीने खेळ करावा लागणार आहे, असे बोलताना वॉर्नर म्हणाला.
रोहित, विराट आणि शमी…
कर्णधार रोहित शर्मा व विराट कोहली सध्या धावासाठी झगडत असले तरी डेव्हिड वॉर्नर त्यांच्या फॉर्मबाबत चिंता करत नाही. तो म्हणाला, रोहित, विराट, जडेजा हे कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळे त्यांना या मालिकेत चांगली कामगिरी करावीच लागणार आहे. यांच्याकडे क्षमता असल्याने या दौऱ्यात ते चांगली कामगिरी करण्याच्या निर्धाराने मैदानात उतरतील. कदाचित या मालिकेत भारतीय संघाला मोहम्मद शमीची कमतरता भासू शकते. मागील वेळी शमीने आम्हाला भरपूर धावासाठी झगडायला लावले होते.