पुणे: सरहद प्रशाला व मिलेनियम कनिष्ठ महाविद्यालय यांनी जिल्हा स्तरीय आंतर शालेय व कनिष्ठ महाविद्यालयीन व्हॉलिबॉल स्पर्धेतील अनुक्रमे 17 वर्षाखालील मुले व मुलींचे विजेतेपद पटकाविले. ही स्पर्धा पुणे महानगरपालिका व जिल्हा क्रीडा परिषद यांनी आयोजित केली होती.
चंद्रशेखर आगाशे महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेतील मुलांच्या अंतिम सामन्यात सरहद संघाने प्राईड प्रशालेचा 25-17, 25-10 असा सरळ दोन गेम्समध्ये पराभव केला. त्याचे श्रेय राज मोरे व साईराज बांदल यांच्या अष्टपैलू खेळास द्यावे लागेल. प्राईड प्रशालेकडून प्रणव साळुखे व सुमित पाटील यांची लढत निष्फळ ठरली. उपांत्य फेरीत सरहद संघाने मिलेनियम संघावर 25-16, 25-21 असा विजय मिळविला. प्राईड प्रशालेने सावित्रीबाई फुले संघाला 25-16, 25-13 असे हरविले. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत मिलेनियम संघाला फुले संघाने पुढे चाल दिली.
मुलींच्या अंतिम सामन्यात मिलेनियम कनिष्ठ महाविद्यालयाने मिलेनियम प्रशालेचा 25-10, 25-13 असा पराभव केला. त्यावेळी त्यांच्याकडून पूर्वा सोनी व पारमी शहा या चमकल्या. पराभूर संघाकडून हर्षदा पवार व साक्षी पेडणेकर यांनी उल्लेखनीय ल्ढत दिली. उपांत्य फेरीत मिलेनियम कनिष्ठ महाविद्यालयाने सिम्बायोसिस प्रशालेचा पराभव केला तर मिलेनियम प्रशालेने सरहद प्रशालेवर मात केली. तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात सिम्बायोसिस संघाने सरहद संघाला 25-17, 25-6 असे पराभूत केले. त्याचे श्रेय गार्गी घाटे, वैभवी चौधरी व रुजुल मोरे यांच्या चतुरस्त्र खेळास द्यावे लागेल. सरहद संघाकडून अदिती शिवतारे व सई तरडे यांचे प्रयत्न अपुरे पडले.