बोक्‍वा व्यायामप्रकार ठरतोय फिटनेस मंत्र !

 ‘बोक्‍वा’ हा व्यायाम प्रकार म्हणायचा का आधुनिक नृत्य प्रकार म्हणायचा यावर सध्या वाद किंवा चर्चा सुरू आहे. अर्थात क्रीडापटूंसाठी व्यायाम प्रकार आणि नृत्य कारणाऱ्यांसाठी नृत्य प्रकार म्हणून जरी हा लोकप्रिय झाला तरी शारीरिक तंदुरुस्तीसाठी त्याचा लाभच होणार आहे. भारतातले सो कॉल्ड क्रीडा समीक्षक किंवा स्वतःला विचारवंत म्हणवणारे गळा काढायला सुरुवात होण्यापूर्वीच या ‘बोक्‍वा’ला लोकाश्रयावरून सरकार बदलाने मग राजाश्रय नसला तरी काही फरक पडत नाही. लोकाश्रय मिळाला तर ‘बोक्‍वा’ची भारतीय संघटनाही अस्तित्वात येईल आणि मग त्याला राजाश्रयही द्यावाच लागेल.

दक्षिण आफ्रिका व्हाया इंग्लंड, अमेरिका एक व्यायाम प्रकार आता भारतातही प्रसिद्ध होतोय नव्हे रुजतोय. बॉक्‍सिंग आणि नृत्याचे पदलालीत्य यांचा मिलाफ वाटणारा हा व्यायाम प्रकार आहे ‘बोक्‍वा’. बो (बॉक्‍सिंग) आणि क्‍वाटा (आफ्रिकन नृत्य शैली) यांच्या मिश्रणातून ‘बोक्‍वा’ हा शब्द तयार झाला. सध्या उच्च वर्गात हा प्रसिद्ध होत असला तरी लवकरच तो तळागाळापर्यंत पोहोचेल यात शंका नाही. ( bokwa exercise benefits )

हॉलीवूड पाठोपाठ टॉलीवुड आणि आता तर बॉलीवूडमध्येही हा ‘बोक्‍वा’ पिंगा घालतोय. प्रचंड एनर्जी देणारा हा सर्वात आधुनिक व्यायाम प्रकार बॉलीवूडच्या येऊ घातलेल्या ‘कॅलेंडर गर्ल्स’ या चित्रपटातून नृत्याच्या माध्यमातून दिसणार आहे. या चित्रपटातील मुख्य नायिका अवनी मोदी सध्या ‘बोक्‍वा’चे भारतीय प्रशिक्षक शिरीष ठक्कर यांच्याकडून ‘बोक्‍वा’चे धडे घेत आहे.

पूर्वी म्हणजे 1980च्या दशकात जितेंद्र किंवा तत्सम नट शाळेत ‘पी. टी.’ केल्याप्रमाणे नाचायचे ना तसाच वाटणारा काहीसा हा व्यायाम प्रकार आहे. मिथुन चक्रवर्ती, गोविंदा या मंडळींनी गाण्यांमधली ही पी. टी. बंद पाडली व आपण हे हातवारे विसरून गेलो होतो, पण जुने कपडे नवीन ढंगात घातले की जसे ‘फॅशन’ म्हणून प्रसिध्द होतात तसाच हा पी. टी. प्रकार आणि बॉक्‍सिंगचे मिश्रण असलेला ‘बोक्‍वा’ नव्याने दाखल झालाय. यातील विनोदाचा भाग सोडला तर प्रचंड एनर्जी देणारा, स्नायूंना शास्त्रीय व्यायाम देणारा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्थूलपणावर नियंत्रण आणणारा असा हा व्यायाम प्रकार आहे. बॉलीवूडचे किंवा टॉलीवूडचेही सोडा तिथे काय चिरंजीवी किंवा धर्मेंद्रसुध्दा मायकल जॅक्‍सनसारखे नाचायचा प्रयत्न करतात आणि त्यांचा तो न बघवणारा पराक्रम प्रेक्षक शिट्ट्या वाजवत वाजवत पाहतात, पण बॉलीवूडने हा ‘बोक्‍वा’ व्यायामातून नृत्य अशा पद्धतीने आपलासा केलाय पण सर्वसामान्य लोकांनी नृत्यातून व्यायाम या पध्दतीने स्वीकारायला काय हरकत आहे.

दक्षिण आफ्रिकेत 1990 च्या दशकात या ‘बोक्‍वा’ला सुरुवात झाली. ‘झुम्बा’ प्रकारापेक्षा अभिनव आणि प्रत्येकाला सहजतेने जमेल असा व्यायाम प्रकार वा नृत्य प्रकार इतकेच त्यावेळी ‘बोक्‍वा’कडे पाहिले जात होते. जसा जसा हा लोकप्रिय होत गेला तसा शारीरिक तंदुरुस्तीसाठीही हा बोक्‍वा अत्यंत लाभदायक असल्याचे समोर आले. व्यायामशाळेत रोज 50 ते 60 किलो वजन उचलणे किंवा रोज 200 मीटर धावणे यापेक्षा केवळ अर्धात तास ‘बोक्‍वा’चा व्यायाम केला तर जास्त चांगले ‘रिझल्ट’ मिळतात असे खुद्द क्रीडा वैद्यक तज्ज्ञ म्हणत आहेत. ( bokwa exercise benefits )

मूळचा दक्षिण आफ्रिकेतला ‘बोक्‍वा’ आता इंग्लंड, अमेरिकेपाठोपाठ जपान आणि भारतातही लोकप्रिय होत आहे. इंग्लंड आणि अमेरिकेत 200 प्रशिक्षण केंद्रे असल्याची नोंद आहे, तर जपानमध्ये शालेय स्तरावर अधिकृत व्यायाम प्रकार म्हणून मान्यता मिळाली आहे. भारतात उत्तर भारत, दक्षिण भारत व काही प्रमाणात महाराष्ट्रात मुंबईत ‘बोक्‍वा’ चांगलाचा रुजतोय. एका भोजपुरी चित्रपटाचे इंग्लंडमध्ये शुटिंग सुरू असताना एका गाण्याच्या दरम्यान ग्रुप डान्सर्सनी हा ‘बोक्‍वा’ सादर केला व तोच या चित्रपटातही घेतला गेला. आता ‘कॅलेंडर गर्ल्स’ या बॉलीवुडपटातून तो महाराष्ट्रातही ‘बोलबाला’ करणार.

क्रीडा क्षेत्रासाठी तर हा ‘बोक्‍वा’ वरदान ठरणार असे दिवसेंदिवस बोलले जात आहे. इंग्लंडमधील कौंटी स्पर्धेत ससेक्‍स संघाच्या खेळाडूंनी शारीरिक तंदुरुस्तीसाठी ‘बोक्‍वा’ आपलासा केला. पाठोपाठ दक्षिण आफ्रिकेतील क्‍वात्मुक नाताळ संघाने त्याचा स्वीकार केला. आता तर काय नुकत्याच भारत दौऱ्यावर येऊन गेलेल्या दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघानेही ‘बोक्‍वा’ची झलक भारतीय क्रिकेटपटूंना दाखवली. येत्या काळात केवळ जागतिक क्रिकेटच नव्हे तर जागतिक क्रीडा क्षेत्रातही ‘बोक्‍वा’ पाय घट्ट रोवेल असे वातावरण तयार होत आहे. एकतर सर्वात कमी खर्चिक असे त्याचे स्वरूप असल्याने भारतातही तळागाळापर्यंत तो लोकप्रिय होण्यास वेळ लागणार नाही. आजच्या घडीला जगभरात जवळपास 4000 प्रशिक्षक या ‘बोक्‍वा’चे अधिकृत व शास्त्रोक्‍त प्रशिक्षण देतात. याबाबत काही अभ्यासक्रमही तयार केले जात असून आणखी प्रशिक्षक घडत आहेत.

लॉस एंजलीसचे फिटनेस ट्रेनर पॉल मावी आणि फिटनेस प्रशिक्षक जॉन वहीम यांनी हॉलीवूड चित्रपटांतील ‘बोक्‍वा’चा प्रवेश घडवला. निकोलस केज आणि जॅकी चॅन यांनीही या व्यायाम प्रकाराचे कौतुक करत अन्य क्रीडापटूंना याकडे वळण्यास प्रोत्साहित केले आहे. आपल्याकडे दक्षिणेतील चित्रपटसृष्टीत म्हणजेच ‘टॉलीवूड’ मध्ये प्रभुदेवा, चिरंजीवी, धनुष या अभिनेत्यांनीही हा बोक्‍वा खरोखरच लाभदायक असल्याचे प्रमाणपत्र दिले. बॉलीवूडमध्ये फिटनेसची जास्तच काळजी घेणारे अभिनेते व अभिनेत्री टॉलीवूडपेक्षा जास्त आहेत. आपल्याकडे ‘सिक्‍स पॅक ऍब’ दिसण्यासाठी काय वाट्टेल ते करायची तयारी बॉलीवूडचे लोक करतात. मग जर त्यासाठी ‘बोक्‍वा’ लाभदायक ठरला तर मग येणाऱ्या अनेक चित्रपटात तीच जुनी जितेंद्र नृत्यशैली पुन्हा एकदा दिसू लागेल.

भारतात योगा आज सर्वाधिक लोकप्रिय आहे, त्यासाठी काही वाहिन्या रोज सकाळी वेगवेगळे कार्यक्रम व प्रात्यक्षिकेही दूरचित्रवाणीवर प्रक्षेपित करत असतात. मात्र आजकाल इंग्लंड, अमेरिकेत या ‘बोक्‍वा’चे टी. व्ही. शो वाढत आहेत. मांडी, मनगट, खांदा, गुडघा, घोटा वा मानेचे स्नायू दुखावल्याने अनेक क्रीडापटूंना अनेक दुखापतींना सामोरे जावे लागते. अनेकदा महत्त्वाच्या स्पर्धेतून किंवा सामन्यांतून याच दुखापतींमुळे खेळाडूंना माघार घ्यावी लागते. या दुखापतींतून सावरण्यासाठी ‘रीहॅब’ घ्यावा लागतो. ‘बोक्‍वा’ हा यासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणून समोर आला आहे. क्रमांक आणि अक्षरे रंगवून त्याबरहुकूम हा व्यायाम सर्वोत्तम पदलालित्य व हातवारे यांच्या जोरावर केला जातो. ( bokwa exercise benefits )

एकाच पायावर तोल सांभाळणे किंवा संपूर्ण शरीराची गोलाकार हालचाल करणे असे कितीतरी प्रकार यात शिकवले जातात. योगासनांमध्ये आसने असतात तशीच ‘बोक्‍वा’मध्ये ‘स्टेप्स’ आहेत. या दोन्हीचा अंगीकार केला तर भारतीयांसाठी निदान तंदुरुस्तीबाबत अच्छे दिन निश्‍चितच येतील. आपल्याला परदेशी वस्तू, कपडे, स्टाईल, राहणीमान यांचे प्रचंड आकर्षण आहे, आता त्यांचा ‘बोक्‍वा’ देखील आपण किती लवकर पत्करतो यावर या व्यायाम प्रकाराचे भारतातील यश अवलंबून आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.