परिसरातील नागरिक त्रस्त : अपघाताच्या पुनरावृत्तीची शक्यता
बोपखेल (वार्ताहर) – येथील रामनगर, गणेशनगर परिसरात मोकाट जनावरांमुळे नागरिक मेटाकुटीस आले आहेत. रोजच रस्त्यात ठाणमांडून बसलेल्या मोकाट जनावरांमुळे पादचारी, वाहनचालक, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी यांना रस्त्याने जाणे कठीण झाले आहे.
मोकाट जनावरे मुख्य रस्त्यात उभे असतात काही रस्त्याच्या मध्येभागी बसतात, त्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा होत आहे. त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. बऱ्याच वेळा ज्येष्ठ नागरिक, महिला, शालेय विद्यार्थ्यांसाठी चालणे, फिरणे जिकरीचे झाले आहे. काही मोकाट जनावरे अचानक एखाद्या गाडीच्या अथवा पादचाऱ्याच्या मागे धावतात. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी भोसरी परिसरात मोकाट जनावराने महिलेला धडक दिल्याने तिला जिवाला मुकावे लागले होते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने अशा मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.
मागील काही दिवसांपूर्वी एका मोकाट वळूच्या हाल्ल्यात नागरिकाला जीव गमवावा लागला होता. या बाबतीत नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे तक्रार केली परंतु प्रशासनाने तात्पुरती मलपट्टी केली. मात्र काही दिवसांनी परिस्थिती जैसे थे सुरू झाली. प्रशासन नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन सोडविण्यासाठी आहे की, त्यापाहून तमाशा पाहण्यासाठी हेच शहरवासीयांना कळेनासे झाले आहे. शहरात ठिकठिकाणी मोकाट जनावरांचा प्रश्न आहे. ते मोकाट जनावरांना मालक आहेत. परंतु प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करून त्यांना पाठीशी घालत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी संताप आहे.
पालिका आयुक्तांकडे वारंवार निवेदन दिले आहेत. तसेच महापालिकेच्या सारथी वेबसाइटवरदेखील तक्रार नोंदविली आहे. परंतु याची दखल घेतली जात नाही. मोकाट जनावरांमुळे या भागात आपघात होतात. तेव्हा प्रशासनाने याची त्वरित दखल घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा.
-भाग्यदेव घुले, सामाजिक कार्यकर्ते, बोपखेल