नवी दिल्ली – देशातील 18 वर्षांवरील सुमारे 69 कोटी प्रौढ नागरिक करोनालसींचा तिसरा म्हणजे बूस्टर डोस घेण्यास पात्र आहेत. मात्र, त्यातील केवळ 11 टक्के प्रौढांनी बूस्टर डोस घेतला आहे. तो निरूत्साह केंद्र सरकारच्या दृष्टीने चिंतेचे कारण बनला आहे.
चालू वर्षी 10 जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी आणि सहव्याधी असणाऱ्या 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर किंवा प्रीकॉशन डोस देण्याचा प्रारंभ झाला. त्यानंतर 10 एप्रिलपासून 18 वर्षांवरील सर्व प्रौढांना बूस्टर डोस घेण्यासाठी पात्र ठरवण्यात आले.
आतापर्यंत 60 वर्षांवरील 10.43 कोटी ज्येष्ठ नागरिकांपैकी 29 टक्के जणांनी बूस्टर डोस घेतला आहे. तर, तो डोस घेणाऱ्या एकूण प्रौढांची संख्या केवळ 7 कोटी 30 लाख 96 हजार 284 इतकी आहे. त्यामुळे बूस्टर डोस घेण्याविषयी निरूत्साह दिसून येत आहे. त्यामागे आधीच दोन डोस घेतले असल्याची आत्मसंतुष्टता आणि करोनाची कमी झालेली धास्ती कारणीभूत असल्याचे तज्ञांना वाटत आहे.