Prabodh Davkhare : नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत धनुष्यबाण हाती घेतला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व पदांचा राजीनामा देत शिवसेनेत पक्षप्रवेश केला. ही राजकीय घडामोडी ताजी असतानाच आता राष्ट्रवादीत एका दिवंगत बड्या नेत्याच्या पुत्राने पक्षप्रवेश केला आहे. नुकत्याच मुंबईत झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत प्रबोध डावखरे यांनी अधिकृतपणे पक्षात प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयामुळे डावखरे कुटुंबात राजकीय फूट पडल्याची चर्चा रंगली आहे. या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते. प्रबोध डावखरे यांचे पक्षात स्वागत करताना छगन भुजबळ म्हणाले की, “वसंत डावखरे हे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी आयुष्यभर पक्षासाठी काम केलं. आता त्यांचे सुपुत्र प्रबोध डावखरे पक्षात येत आहेत, ही आनंदाची बाब आहे. ते उत्तम व्यावसायिक असून महाराष्ट्रात ३० जिम चालवतात. पक्षात त्यांना योग्य मान-सन्मान मिळेल.” भुजबळांनी केलेल्या वक्तव्यानंतर प्रबोध डावखरे यांच्यावर मोठी जबाबदारी पक्षाकडून सोपविण्यात येणार असल्याची चर्चा रंगली आहे. यावेळी दिलीप वळसे पाटील यांनीही प्रबोध डावखरे यांच्या प्रवेशाचे स्वागत करत त्यांच्यावर ठाण्यात पक्षसंघटन मजबूत करण्याची जबाबदारी सोपवली जाऊ शकते, असा विश्वास व्यक्त केला. त्यांनी वसंत डावखरे यांच्या राजकीय कारकिर्दीचा उल्लेख करत त्यांचा वारसा पुढे नेण्याची अपेक्षा व्यक्त केली. दरम्यान, प्रबोध डावखरे यांनी आपल्या भाषणात वडिलांची आठवण सांगत भावनिक प्रतिक्रिया दिली. “हा माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. माझ्या वडिलांनी आयुष्यभर ज्या पक्षासाठी मेहनत घेतली, त्याच पक्षात आज मी प्रवेश करत आहे. रुग्णालयात असताना त्यांनी मला सांगितलं होतं की, राजकारणात यायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जा. त्यांची ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आज मी हा निर्णय घेतला,” असे ते म्हणाले. प्रबोध डावखरे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे ठाणे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये नव्या चर्चांना उधाण आले आहे. कोण आहेत प्रबोध डावखरे? प्रबोध डावखरे हे उद्योजक आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले व्यक्तिमत्त्व असून ते दिवंगत ज्येष्ठ नेते वसंत डावखरे यांचे पुत्र आहेत. तसेच भाजपचे विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे यांचे मोठे बंधू आहेत. प्रबोध डावखरे हे मुख्यतः फिटनेस आणि जिम व्यवसायाशी संबंधित आहेत. महाराष्ट्रातील विविध भागांत त्यांनी सुमारे ३० जिम सुरू केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्या पक्षप्रवेशावेळी दिली. व्यवसायासोबतच ते सामाजिक आणि संघटनात्मक कामांमध्येही सक्रिय असल्याचे सांगितले जाते. त्यांचे वडील वसंत डावखरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावी नेत्यांपैकी एक होते. त्यांनी विधान परिषदेचे उपसभापती म्हणून काम केले होते आणि ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची मजबूत संघटना उभी करण्यात मोठी भूमिका बजावली होती. हेही वाचा : Rahul Gandhi : ” नरेंद्र मोदी, अमित शाह अन् RSS गद्दार” ; राहुल गांधींचे वादग्रस्त वक्तव्य