पुस्तक परीक्षण: टिल आय डाय!

स्वतःपासूनच दुरावण्याच्या या युगात आपल्या सर्वांत जवळची व शाश्‍वत असलेली गोष्ट म्हणजे “मराठी साहित्याचा ठेवा’. मराठी साहित्याचं आणि आपलं नातं अजून घट्ट व्हावं यासाठी पुस्तकं आपण निवांत वेळी वाचू शकतो. रात्री झोपण्याअगोदर आणि सकाळी झोपेतून उठल्यानंतर काही वेळ पुस्तकं वाचल्याने आपले मन प्रसन्न होते. नव्या दिवसासाठी नवी प्रेरणा मिळते.

श्रीनिवास पटवर्धन यांनी अनुवादित केलेल्या संपूर्ण वेगवेगळ्या विषयांवरच्या पाच अप्रतिम कथा या पुस्तकात आहेत. यातील “टिल आय डाय!’ या शीर्षक कथेत लेखकाने आपल्या सर्वात धाकट्या मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्या आयुष्याची रोमहर्षक शौर्यगाथा लिहिली आहे. यात लेखकाच्या मुलाचा जेवढा शौर्याचा वाटा आहे, तेवढाच त्याच्या मातापित्यांच्या अथक परिश्रमांचाही आहे.

या मुलाचा आत्मविश्‍वास आणि धैर्य यापुढे मृत्यूनंसुद्धा तोंडात बोटं घातली असतील! जन्मतःच नियतीनं ज्याला असाध्य रोगाच्या बाळलेण्याचा आहेर केला, त्यानं सतत अठरा वर्षे मृत्यूशी दोन हात केले! म्हणून पित्याने त्याचं नाव द मायटी डॅमन असं ठेवलं अन्‌ त्याप्रमाणेच त्यानं आपलं नाव सार्थ करून दाखवलं. ही शौर्यगाथा म्हणजे एका पित्याने आपल्या असाधारण मुलाला वाहिलेली हृदयस्पर्शी श्रद्धांजलीच आहे.

“विसाव्या शतकातील असामान्य गुप्तहेर’ या कथेत दुसऱ्या महायुद्धाला वेगळी कलाटणी देणारा विसाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ गुप्तहेर “रिचर्ड सॉर्ज’, तसेच “अजब धन्वंतरी’ या कथेत अद्‌भुत वैद्यकीय कौशल्य लाभलेला सामान्य खाणकामगार “ऍरिगो’ यांच्या विलक्षण जीवनप्रवासाने आपली मती गुंग होते.

“व्यसनाच्या विळख्यात’ या कथेत एका सूज्ञ धर्मगुरूची व्यसनाच्या विळख्यात अडकल्यावर होणारी तगमग आपल्याला अंतर्मुख करते, तर “अटलांटिक महासागराच्या विक्राळ जबड्यात 133 दिवस’ या कथेत एका फुटलेल्या जहाजावरून वाहून गेल्यामुळे केवळ एका तराफ्यावर तरंगत अटलांटिक महासागरात किनाऱ्यापासून 1200 किलोमीटर दूर 133 दिवस पून लिम या “एस्‌. एस्‌. बेनलोमॉंड’ या व्यापारी जहाजावर या केबिन बॉयनं एकट्यानं संकटांना तोंड देत, धैर्यानं आणि आपल्या मनाचा समतोल ढळू न देता काढले.

या सत्यकथा लेखकाने प्रत्ययकारी भाषेत आपल्यापर्यंत पोहोचविल्या आहेत. पुस्तक अतिशय साधे असून “मुळातच दर्जेदार असलेल्या साहित्याला भपकेबाज सौंदर्याचं कोंदण कशाला?’ असे हे पुस्तक प्रकाशित केलेल्या भारत बुक हाऊस या प्रकाशनाचे म्हणणे आहे. 160 पाने असलेल्या या पुस्तकाची किंमत केवळ 50 रुपये आहे.

– शर्मिला जगताप

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.