पुस्तक परीक्षण : ‘ब्र ‘

माधुरी तळवलकर

नावापासूनच वैशिष्ट्यपूर्ण ठरणारी राजहंस प्रकाशनची “ब्र’ ही कादंबरी चांगलीच गाजली. कविता महाजन यांच्या या पुस्तकाला राज्य पुरस्कारही मिळाला. “गप्प बस… नाहीतर…’ या धमकीला न घाबरता धाडसाने उच्चारलेला शब्द म्हणजे ब्र. या कादंबरीची नायिका प्रफुल्ला या एका सर्वसाधारण गृहिणीनं हा “ब्र’ शब्द उच्चारला.
स्वतःच्या कौटुंबिक निराशेतून बाहेर येऊन डोळसपणे बाहेरच्या जगाकडे पाहिले. त्यातून आलेले अनुभव घेत ती समृद्ध होत गेली.

33 टक्‍के जागा स्त्रियांसाठी राखीव करणारे विधेयक केंद्र सरकारने करण्यापूर्वीच महाराष्ट्रात 1990 साली संमत झाले. 1992 साली ही घटनादुरुस्ती झाली. या विधेयकामुळे देशभरातील दहा लाख स्त्रिया पंचायतराज व्यवस्थेमध्ये अंतर्भूत झाल्या. या नवीन सुधारणेमुळे महाराष्ट्रातील किती स्त्रियांना गावपातळीवरील सत्तेमध्ये सहभाग मिळाला? त्यात काही अडचणी आल्या का? आदिवासी स्त्रियांना याचा कितपत लाभ झाला? दुर्गम भागातील स्त्रियांना त्यांचा कार्यकाल पूर्ण करता आला का? असे अनेक मुद्दे यात आहेत. काही स्वयंसेवी संस्था याविषयीची माहिती गोळा करण्याचे ठरवतात. त्यातील एका संस्थेत या प्रकारचे काम करण्याचे प्रफुल्ला ठरवते.

हे फील्डवर्क करताना तिला डोंगराळ भागात फिरावे लागते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करणाऱ्या अडाणी स्त्रियांशी ती चर्चा करते. वाड्यापाड्यांवर त्यांच्याबरोबर ती राहते, जेवते. त्यातून तिचे अनुभवविश्‍व विस्तारते आणि मग
स्वतःची वैयक्‍तिक सुखदुःखे तिला क्षुद्र वाटू लागतात. ग्रामपंचायतीत आदिवासी स्त्रियांसाठी राखीव जागा ठेवण्याचा कायदा आला खरा; पण सत्ता नेहमी स्वतःच्या हातात असण्याची सवय असलेले पुरुष ती सोडायला तयार होत नाहीत. स्त्रियांनी सत्तेच्या आसपासही फिरकू नये यासाठी निवडणुकीत उभे राहणाऱ्या स्त्रियांना हर तऱ्हेने नामोहरम करण्याचा पुरुषांनी प्रयत्न केला. कधी त्यांना मारहाण करायची, त्यांची बदनामी करायची, त्यांच्या शेताची नुकसान करायची अशा त्यांच्या उचापती चालतात.

मात्र ज्या स्त्रियांना खरोखरच समाजकार्याची कळकळ होती, त्या चिकाटीने काम करीत राहिल्या. हळूहळू स्त्रिया, इतर समाज त्यांच्या पाठीशी उभा राहू लागला. प्रफुल्लाने केलेल्या सर्व्हेमध्ये तिच्या लक्षात आलं की, घरात लांबून पाणी भरण्यापासून अनेक कष्टाची कामं केल्यावर स्त्रिया चावडीत येत राहिल्या आणि गावाच्या कल्याणाची अनेक कामं त्यांनी करून दाखवली. ज्या संस्थेतर्फे प्रफुल्ला हे काम करीत असते त्या संस्थेमधलेही अनेक ताणेबाणे तिच्या लक्षात येतात. इतर स्वयंसेवी संस्थांशीही तिचा जवळून संबंध येतो. या पुस्तकात शहरपातळीवरील राजकारणावरही भाष्य आहे. एक नगरसेविका म्हणते, रात्री-बेरात्री होणाऱ्या मिटिंग्ज, मद्यपान, गुंडगिरी यामुळे राजकारण हे पुरुषांचेच क्षेत्र आहे असे स्त्रियांना दाखवायचे आणि त्यांना सत्तेपासून दूर राखायचे हा पुरुषांचा डाव आहे.

कादंबरीची नायिका प्रफुल्ला हिची वैयक्‍तिक सुखदुःखे, डोंगराळ भागातल्या आदिवासी बायकांच्या कहाण्या आणि स्वयंसेवी संस्थांमधल्या घडामोडी अशा तीन स्तरांवर “ब्र’ या कादंबरीचा पट विणला आहे. ही संपूर्ण कादंबरी प्रसंगांमधून उलगडत जाते. वेगवेगळ्या भागात जाऊन, बायकांच्या घरी जाऊन किंवा एका ठिकाणी बोलवून त्यांना प्रफुल्ला बोलते करते. ते त्यांच्याच शब्दांत पुस्तकात मांडले आहे. सर्वसाधारण गृहिणीपासून आत्मनिर्भर, प्रगल्भ अशा समाजसेविकेपर्यंत प्रफुल्लाचा होणारा प्रवास वाचताना वाचक रंगून जातो.

Leave A Reply

Your email address will not be published.