पुस्तक परीक्षण : सोनेरी वाटचाल

प्रतिनिधी

रसिकांच्या मनावर आपल्या सुमधुर आवाजाने अधिराज्य गाजविणाऱ्या लोकप्रिय गायिका चारुशीला बेलसरे यांनी संगीतसेवेची 50 वर्षे पूर्ण केली. त्यांनी आपल्या सुवर्णमहोत्सवी वाटचालीनिमित्त “माझ्या संगीतमय जीवनाची सोनेरी वाटचाल’ हे पुस्तक लिहिले आहे. वयाच्या अकराव्या वर्षी पहिला जाहीर कार्यक्रम चारुशीला यांनी मुंबई येथे 15 फेब्रुवारी 1970 रोजी सादर केला.

या छोट्याशा वयातही अठरा गीते गाऊन रसिकांची वाहवा मिळविली. वयाच्या अकरा ते पंधरा वर्षांपर्यंतच्या अवधीत त्यांनी पाच चित्रपटांमध्ये सहा गाणी गायली. त्यामुळे चारुशीला बेलसरे हे नाव रसिकांच्या हृदयसिंहासनावर विराजमान झालं.

संगीतमय जीवनाची वाटचाल आई सुरेखा आकाशवाणीची गायिका आणि वडील सुरेश हे तबलावादक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली. आकाशवाणी, दूरदर्शन याबरोबर संगीताचे जाहीर कार्यक्रम महाराष्ट्रात व इतर ठिकाणी होऊ लागले. यासंबंधी माहिती त्यांनी या पुस्तकात दिली आहे. संगीतात आई-वडील पहिले गुरू त्यानंतर सुधीर फडके, पं. सी. आर. व्यास, सी. रामचंद्र, पं. भीमसेन जोशी यासारख्या दिग्गजांचे मार्गदर्शन लाभले. यासंबंधी तपशीलवार विवेचन या पुस्तकात मिळते.

संगीत हाच श्‍वास आणि ध्यास मानून केलेली वाटचाल कौतुकास्पद असल्याचे जाणवते. अतिशय परिश्रमपूर्वक केलेला संगीतप्रवास साध्या सोप्या भाषेत मांडला आहे.
गायिका, संगीतकार या नात्याने वेळोवेळी चारुशीला बेलसरे यांना रसिकांकडून प्रशंसा मिळाली. रसिकांविषयी कृतज्ञतापूर्वक उल्लेख करताना संपर्कात आलेल्या व्यक्‍तींविषयी ऋण व्यक्‍त करताना लेखक, कवी, गीतकार व मान्यवरांचा विशेष उल्लेख केला आहे.

अगदी लहान वयात संगीतप्रवासाला सुरुवात करून आजपर्यंतच्या 50 वर्षांच्या वाटचालीतून चारुशीला बेलसरे यांच्या गायन कलेची ओळख समर्पकतेने झाली आहे. पुस्तकातील घटना व प्रसंगाला अनुसरून काही प्रसंगचित्र समाविष्ट केल्याने पुस्तकाची उपयुक्‍तता वाढली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.