बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर हा आलिया भट्टसोबतच्या रिलेशनशिपमुळे सध्या चर्चेत आहे. यानंतर आता रणबीर आपल्या एका चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. रणबीर सध्या त्याच्या आगामी “लव्ह रंजन’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी नोएडामध्ये आहे. या चित्रपटात तो अभिनेत्री श्रद्धा कपूरसोबत दिसणार आहे.
श्रद्धा आणि रणबीर पहिल्यांदाच एकत्रीत स्क्रिन शेअर करत आहे. आता चित्रपटाशी संबंधित आणखी एक माहिती समोर येत आहे. या चित्रपटात रणबीर आणि श्रद्धा कपूर यांच्यासह बोनी कपूर आणि डिंपल कपाडियादेखील दिसणार आहेत. बोनी आणि डिंपल रणबीरच्या आई-वडिलांची भूमिका साकारणार आहेत. या भूमिकेसाठी दिग्दर्शकाला बोनी कपूर हवा होता.
मात्र जेव्हा ही भूमिका बोनी कपूरला देण्यात आली तेव्हा त्यांनी नकार दिला. त्यानंतर बोनी कपूरने या भूमिकेस सहमती दर्शविली आहे. दरम्यान, बोनी कपूरने नुकतेच अनिल कपूरच्या “एकेवर्सेस एके’ या चित्रपटातून अभिनय जगतात पदार्पण केले आहे.
तथापि, हा चित्रपट मोठ्या पडद्यावर नव्हे तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. रणबीर कपूरविषयी सांगायचे झाल्यास “लव्ह रंजन’शिवाय तो “ऍनिमल’ आणि “ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात काम करत आहे.