मुंबई – रिझर्व्ह बँक शुक्रवारी मवाळ पतधोरण जाहीर करेल असे देशातील आणि परदेशातील गुंतवणूकदारांना वाटत आहे. त्यामुळे या गुंतवणूकदारांनी भारतीय कर्जरोख्यामध्ये गुंतवणूक वाढविली आहे. अशा परिस्थितीत भारताच्या दहा वर्ष मुदतीच्या कर्जरोख्यावरील परतावा कमी होऊन तीन वर्षाच्या निचांकावर आला आहे. याचा अर्थ व्याजदर कपातीसह रोख राखीव प्रमाणात घट होईल असे या गुंतवणूकदारांना वाटत आहे.
भारताने पुढील वीस वर्षात निरंतर किमान 8% विकासदराचे उद्दिष्ट ठरविले आहे. मात्र पहिल्या तिमाहीत विकासदर 6.7% तर दुसर्या तिमाहीत केवळ 5.4% नोंदला गेला आहे. यामुळे विकास दरावर परिणाम होणार आहे. अशा परिस्थितीत अर्थ मंत्रालयाने व्याजदर कपातीची आवश्यकता व्यक्त केली आहे. याची दखल प्रत्यक्ष-अपत्यक्षरीत्या पतधोरण समिती घेईल. आणि शुक्रवारी तुलनेने मवाळ पतधोरण जाहीर करेल असे या गुंतवणूकदारांना वाटत आहे.
परदेशी संस्थागत गुंतवणूकदाराकडून या आठवड्यात शेअर बाजाराबरोबरच भारतीय रोखे बाजारात गुंतवणूक वाढत आहे. त्यामुळे सध्या दहा वर्षाच्या कर्जरोख्यावरील परतावा कमी होऊन 6.69 टक्क्यांवर आला आहे. गेल्या शुक्रवारी विकासदर 5.4% पर्यंत कमी झाल्याची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर तेव्हापासून भारतीय कर्जरोख्यावरील परतावा कमी होत आहे.
काही बँकर्सनी सांगितले की, रोख राखीव प्रमाणामध्ये जर 0.50% कपात झाली तर बँकाकडे 1.1 लाख कोटी रुपये म्हणजे 13 अब्ज डॉलर कर्जपुरवठ्यासाठी उपलब्ध होणार आहेत. जर खरोखरच रोख राखीव प्रमाणात कपात झाली तर लघु पल्ल्याच्या रोख्यावरील परतावा आणखी कमी होऊ शकेल. गेल्या तीन दिवसांत देशातील गुंतवणूकदाराकडून 77 अब्ज डॉलरच्या भारतीय कर्जरोख्याची खरेदी झाली आहे. तर याच कालावधीत परदेशी गुंतवणूकदारांनी 202 अब्ज रुपयाच्या कर्जरोख्याची खरेदी केली आहे.