Delhi schools Bomb Threat : दिल्लीतील किमान सहा शाळांना शनिवारी बॉम्बची धमकी मिळाली. या आठवड्यात राष्ट्रीय राजधानीतील शाळांना धमकीचे ई-मेल पाठवण्याची ही तिसरी घटना आहे. दिल्ली अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आम्हाला सकाळी ६.०९ वाजता दिल्ली पब्लिक स्कूल आरके पुरममध्ये बॉम्ब असल्याची धमकी आली.
अग्निशमन विभाग, स्थानिक पोलीस, श्वानपथक आणि बॉम्ब पथक शाळेत पोहोचल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. त्यानंतर शोध मोहीम सुरू करण्यात आली. वसंत कुंजमधील रायन इंटरनॅशनल स्कूल आणि साकेतमधील ज्ञान भारती स्कूलसह इतर पाच शाळांनाही अश्या पद्धतीचे ईमेल प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, कोणत्याही शाळेत झडती आणि तपासणी केल्यानंतर काहीही संशयास्पद आढळले नाही.
शुक्रवारी सुमारे ३० शाळांना ईमेलद्वारे बॉम्बच्या धमक्या मिळाल्या होत्या, त्यानंतर अनेक एजन्सींनी शाळेच्या परिसराची झडती घेतली. यापूर्वी सोमवारी किमान ४४ शाळांना अशाच धमक्या देण्यात आल्या होत्या. झडतीदरम्यान काहीही संशयास्पद आढळले नाही, तेव्हा पोलिसांनी या धमक्यांना अफवा असल्याचे म्हटले.
बॉम्बची धमकी म्हणजे शाळकरी मुलांची खोड!
दुसरीकडे, शनिवारी धमकीच्या ईमेलच्या एका जुन्या प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने एका खासगी शाळेत शिकणाऱ्या मुलाचा शोध घेतला. ज्याने शाळेला धमकीचे ईमेल पाठवले होते. मात्र, मुलाचे समुपदेशन करून त्याच्या पालकांना मुलावर लक्ष ठेवण्याचा सल्ला देऊन त्याला सोडून दिले. शाळांना धमक्या येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही शाळांना बॉम्बच्या धमक्या आल्या आहेत.