कोल्हापूर – आजपासून राज्यातील सर्व मंदिरे भाविकांना दर्शनासाठी खुली करण्यात आली आहे. तसेच नवरात्र महोत्सव सुरु झाला आहे. आज घटस्थापनेदिवशी अनेक भाविक मंदिरात जाऊन दर्शन घेत आहेत. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. मात्र अशातच मंदिरात बाॅम्ब ठेवल्याचा निनावी फोन पोलीस कंट्रोल रूमला आला आणि एकच खळबळ उडाली.
📌 महत्वाचे!
आज नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी आई अंबाबाईचे दर्शन सुरू असताना मंदिरामध्ये बॉम्ब ठेवल्याचा पोलीस कॅट्रोल रूमला निनावी दूरध्वनी आला. यानंतर, पोलिसांच्या बिडीडीएस पथकाने शोध मोहीम राबवली असून असा कोणताही अनुचित प्रकार आढळून आलेला नाही. @KOLHAPUR_POLICE— Satej (Bunty) D. Patil (@satejp) October 7, 2021
पोलिसांना निनावी फोन येताच पोलिसांच्या बिडीडीएस पथकाने मंदिरात शोध मोहीम राबवली मात्र, असा कोणताही अनुचित प्रकार आढळून आला नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनीही ट्वीट करून तेथे काहीही अनुचित प्रकार घडला नसल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, निनावी फोननंतर काही वेळ दर्शन बंद करण्यात आले होते. मात्र, आता ते पुन्हा सुरु करण्यात आले आहे. पोलिसांकडून या निनावी फोन करणाऱ्यांचा तपास सुरु आहे. बाॅम्ब ठेवल्याच्या अफवांवर विश्वास न ठेवता अंबाबाईचे दर्शन घेण्याचे आवाहनही सतेज पाटील यांनी केले आहे.