चंदिगढ – स्वातंत्र्यदिन जवळ आलेला असताना पंजाबमध्ये स्फोटकांचा मोठा साठा आढळून आला आहे. अमृतसरमधील एका गावात 2 किलो आरडीएक्स असलेला एक टिफीन बॉक्स सापडला आहे. हा टिफीन बॉक्स पाकिस्तानातून आलेल्या ड्रोनमधून टाकण्यात आला असावा, असा संशय व्यक्त होतो आहे.
हा टिफीन बॉक्स ज्या पिशवीमध्ये होता त्यात अन्य काही स्फोटके देखील होती असे पोलीस महासंचालक दिनकर गुप्ता यांनी सांगितले. अमृतसर ग्रामीण जिल्ह्यात सापडलेल्या या पिशवीमध्ये काही हातबॉम्ब आणि काट्रेज सापडले आहेत. या टिफिन बॉक्समध्ये आयइडी देखील आहेत, असे गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
हे आयइडी दोन कप्प्यांच्या डब्यात भरलेले होते. अमृतसर जवळच्या धालिके गावात लोपोके पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडले. हे बॉम्ब सीमेपलिकडून ड्रोनच्या माध्यमातून पोचवले गेले असावेत, असे ते म्हणाले.
गावच्या माजी सरपंचांनी या परिसरात ड्रोनच्या हालचालींबद्दल पोलिसांना कळवले. या पिशवीमध्ये सात पाउच, एक प्लॅस्टिकचा टिफीन, पाच हातबॉम्ब, 9 एमएम पिस्तुलची 100 काडतुसे होती. या सर्व स्फोटकांचे वजन 2 किलो इतके होते. या ठिकाणी रिमोट कंट्रोल डिव्हाईस आणि स्वीच देखील सापडले होते. हे बॉम्ब फोम पॅकिंगमध्ये बांधलेले होते, असेही पोलीस महासंचालक म्हणाले. या प्रकरणाच्या तपासासाठी पंजाब पोलीस नॅशनल सिक्युरिटी गार्डची मदत घेत आहेत.
एनएसजीचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे आणि या आधुनिक बॉम्बमध्ये 2-3 किलो आरडीएक्स असल्याचा प्राथमिक निष्कर्श काढण्यात आला आहे. या बॉम्बबरोबर यु आकाराचे चुंबक आणि इलेक्ट्रीक सर्किट, 9 व्होल्टची बॅटरी आणि 3 डिटोनेटरदेखील या पिशवीमध्ये सापडले आहे, असेही पोलिसांनी सांगितले.
काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानातून आलेल्या ड्रोनमधून टाकलेले 11 बॉम्ब पंजाबमधील गुरदासपूर जिल्ह्यात सापडले होते. यापूर्वी 2019 च्या सप्टेंबरमध्ये तरन तारन जिल्ह्यात ड्रोनमधून टाकलेली एके-47 रायफल, मॅगझीन, काडतुसे हातबॉम्ब आणि नकली चलनी नोटा सर्वप्रथम सापडल्या होत्या.