जीप-ट्रकच्या धडकेत तरुण ठार

महाबळेश्‍वरजवळील दुर्घटना : आठजण गंभीर
पाचगणी  –
महाबळेश्‍वर तालुक्‍यातील अवकाळी येथे दाट धुक्‍याचा अंदाज न आल्याने जीप आणि ट्रकची भीषण धडक झाली. या अपघातात एक तरुणाचा जागीच मृत्यू, तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.

अक्षय महादेव काळे (रा. उस्मानाबाद, वय 24) असे अपघातातील मृताचे नाव आहे.
अधिक माहिती अशी, उस्मानबाद येथील वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी शनिवारी जीपमधून महाबळेश्‍वरला पर्यटनासाठी निघाले होते. सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास त्यांची जीप महाबळेश्‍वरजवळील अवकाळी परिसरात आले असताना दाट धुक्‍यामुळे चालकाला अंदाज न आल्याने ट्रकशी समोरा-समोर भीषण धडक झाली. या धडकेत चालक अक्षय महादेव काळे याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

तर अरबाज रहिमतुल्ला शेख, अनिकेत भातमरकर, कृष्णा मगर, वसंत ज्ञानेश्‍वर कदम, दिगंबर गायकवाड, ऋषिकेश विलास नाईक, शेखर वासुदेव धांगेकर, पंकज प्रल्हाद कांबळ, विजय प्रचंड भिसे (सर्व राहणार उस्मानाबाद) हे जखमी झाले आहेत. सदर अपघात माहिती मिळताच पाचगणी येथील आपत्कालीन पथक, अवकाळी गावच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.