दिल्ली – नवीन संसद भवनाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. यापार्श्वभूमीवर बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने संसद भवनाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ‘नव्या भारतासाठी नवीन संसद भवन’, अशी प्रतिक्रिया दिली आहे. शाहरुखसह बॉलिवूडच्या अनेक दिग्गज कलाकारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत नवीन संसदेच्या इमारतीबाबत आनंद व्यक्त केला आहे.
संसदेच्या नव्या भवनाचा व्हिडीओ ट्वीट करत शाहरुख खानने लिहिलं आहे,”आपल्या संविधानाचे समर्थन करणाऱ्या, या महान राष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि विविधतेचे रक्षण करणाऱ्या प्रत्येकासाठी हे नवीन संसद भवन आहे. नव्या भारतासाठी नवीन संसद भवन. पण भारताच्या गौरवाचे स्वप्न जुनेच. जय हिंद! माझे संसद भवन माझा अभिमान.
शाहरुखने शेअर केलेल्या दीड मिनिटांच्या व्हिडीओमध्ये तो म्हणत आहे,”भारताचे नवीन संसद भवन. आपल्या स्वप्नातलं घर, 140 कोटी भारतीयांचं घर. या घरात देशातील वेगवेगळ्या राज्यातील, गावातील, शहरातील सर्व जाती-धर्मातील मंडळी एकत्र नांदतील. सत्यमेव जयतेचा नारा नसून विश्वास असायला हवा. हत्ती-घोडे, सिंह आणि अशोक चक्राचा स्तंभ हा लोगो नसून आपला इतिहास असावा”.
अक्षय कुमार
अक्षय कुमारने व्हॉईस ओव्हरमधील एक व्हिडिओ शेअर केला आहे. “नवीन संसदेची इमारत पाहून मला एक वेगळाच आनंद मिळत आहे. मला आठवते, मी जेव्हा दिल्लीत माझ्या आई-वडिलांसोबत राहत होतो, तेव्हा मी इंडिया गेट आणि त्याच्या आजूबाजूला जायचो तेव्हा बहुतेक इमारती ब्रिटिशांनी बांधल्या होत्या. हे लोकशाहीचे मंदिर आहे. हीच नव्या भारताची ओळख आहे. असा भारत जो केवळ संस्कृती आणि वारशातच आघाडीवर राहिला नाही, तर आता प्रगती आणि विकासाने पुढे जात आहे. ही संसद पाहिल्यावर घर, तुमचा देश कुठे होता आणि आता कुठे पुढे गेला आहे हे लक्षात येते.” असे अक्षयने म्हंटले आहे.
रजनीकांत
रजनीकांत यांनी सेंगोलच्या माध्यमातून तामिळनाडूच्या जनतेचा सन्मान केल्याबद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. ‘तामिळ सत्तेचे पारंपारिक प्रतीक असलेला राजदंड भारताच्या नवीन संसद भवनात चमकेल,’ असे ते म्हणाले आहेत.
हेमा मालिनी
हेमा मालिनी यांनी देखील एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात त्या “संसदेची नवी इमारत ही ही देशासाठी गौरवाची आणि अभिमानाची बाब आहे,” असे म्हणताना दिसतात.
संसदेच्या नवीन इमारतीची काय आहेत वैशिष्ट्ये?
नवीन संसदेच्या इमारतीचे क्षेत्रफळ 64,500 चौरस मीटर एवढे आहे. सध्याच्या संसदेच्या इमारतीच्या बाजुलाच ही नवी इमारत बांधण्यात येत आहे. सेन्ट्रल व्हिस्टा विकास प्रकल्पांतर्गत नवीन संसद भवनाची इमारत उभारण्यात आली आहे. संयुक्त अधिवेशनात लोकसभा कक्ष 1272 सदस्यांना सामावून घेण्यास सक्षम असेल.
उर्वरित इमारतीत मंत्र्यांची कार्यालये आणि समिती कक्षांसह 4 मजले असतील. त्रिकोणी आकाराच्या या नव्या संसद भवनाच्या इमारतीच्या बांधकामाला 15 जानेवारी 2021 मध्ये सुरुवात झाली होती. मात्र कोरोनामुळे ह्या इमारतीचे काम पूर्ण करण्यास विलंब झाला होता.