मुंबई – कोरोनाव्हायरसच्या प्रादुर्भावामुळे आलेल्या कोव्हिड19 च्या साथीमुळे तब्बल सहा महिने बंद असलेली गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहे. मात्र, कोरोनाच्या धास्तीपायी अजूनही बॉलीवूड टुरिझम या प्रकल्पाला पर्यटकांचा नगण्य प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. लॉकडाऊन अर्थात टाळेबंदीच्या शिथिलीकरणानंतर म्हणजेच अनलॉक-6 प्रक्रिये अंतर्गत आता अनेक सिनेमा आणि मालिकांचे चित्रीकरण सुरू झाले आहे.
मात्र, चित्रीकरण सुरु होऊनही फिल्मसिटीतील पर्यटनास परवानगी देण्यात आली नव्हती. सहा महिने “बॉलीवूड टुरिझम’ हा पर्यटन व्यवसाय बंद असल्याने त्यावर अवलंबून असणाऱ्या चालक, वाहक, सेवक, अभिनेते, अशा कर्मचाऱ्यांचा रोजगार बुडाला होता. या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांकडून चित्रनगरीतील पर्यटन सुरू करण्याची मागणी केली होती. त्याप्रमाणे राज्य शासनाला निवेदनही दिले होते. आणि आता 23 ऑक्टोबरपासून फिल्मसिटी पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहे. मात्र, कोरोनाच्या भीतीपायी अजूनही पर्यटकांचा नगण्यच प्रतिसाद मिळत आहे.
कोरोनामुळे बंद असलेले फिल्मसिटीतील पर्यटन गेल्या आठवड्यापासून सुरू करण्यात आले. यासाठी एक महिन्यापासून नियोजन सुरु होते. आधी कर्मचाऱ्यांना कोरोनाकाळात घ्यायची काळजी, सुरक्षेचे उपाय यांचे प्रशिक्षण देण्यात आले. गावी गेलेल्या कर्मचाऱ्यांना परत बोलावण्यात आले असून सध्या आठ कर्मचारी काम करीत आहेत. गेल्या आठवड्यात केवळ सात ते आठ पर्यटकांनी चित्रनगरीस भेट दिली. कोरोनाच्या धास्तीपायी अजूनही पर्यटक येण्यास कचरत आहेत. दिवाळीत जास्त पर्यटक येण्याची अपेक्षा आहे, असे समजते.