मुंबई- अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदाने भारतीय व्यवस्थापन संस्था, अहमदाबाद या प्रख्यात बिझनेस स्कूलमध्ये प्रवेश मिळविला आहे. यासाठी असणारी कठीण परीक्षा सीईटी /आयएटी नव्या पास झाली आहे. आता पुढील दोन वर्ष अहमदाबाद मध्ये शिक्षण घेतल्यानंतर नव्या जागतिक पातळीवर मागणी असलेली या संस्थेची एमबीए पदवी मिळणार आहे.
या संस्थेत प्रवेश घेण्याची आपली लहानपणापासूनची इच्छा होती. त्यासाठी आपण भरपूर अभ्यास केला. त्याचबरोबर आमच्या सरांचे आम्हाला मार्गदर्शन झाले. त्यामुळे ही परीक्षा आपण पास होऊ शकलो. आता आपण पुढील दोन वर्ष या संस्थेत भारतातील सर्वोत्कृष्ट लोक आणि शिक्षकांबरोबर राहणार आहोत, असे नवेलीने म्हटले आहे.
यासाठीची प्रवेश परीक्षा पास झाल्यानंतर आपल्याला भयंकर आनंद झाला होता. तो आपण मित्र आणि कुटुंबीयांसोबत साजरा केला. मात्र आगामी दोन वर्षात आपल्याला खडतर परिश्रम करावे लागणार आहेत याची आपल्याला जाणीव आहे.
नव्याने ब्लेंडेड पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळविला आहे. हा अभ्यासक्रम या वर्षापासून सुरू झाला आहे. यामध्ये संस्थेतील अभ्यासाबरोबरच ऑनलाइन क्लासेस घेतले जातात. यशस्वी उद्योग आणि उद्योजकाबरोबर संवाद साधला जातो. त्यामुळे हा अभ्यास क्रम पूर्ण करणार्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच कार्यानुभव मिळतो.
ही कठीण परीक्षा पास होऊन या संस्थेत प्रवेश मिळविल्याबद्दल नव्याच्या मातोश्री श्वेता बच्चन यांनी अभिमान व्यक्त केला. हिंदी चित्रपट सृष्टीतील त्यांच्या मैत्रिणी सुहाना खान, अनन्या पांडे, शहाणा कपूर, झोया अख्तर यांनी त्यांचे अभिनंदन केले. नव्व्या यांच्या वडिलांचा ट्रॅक्टर आणि कृषी क्षेत्रातील उपकरणे निर्माण करण्याचा उद्योग आहे. त्या उद्योग क्षेत्रातच जाणार असल्याचे त्यांनी सुरुवातीपासून सांगितले होते.