नवी दिल्ली, दि. 15- सरड्याचे मानवी रूप पाहायचे असेल तर हा व्हिडीओ नक्की पाहा. हा माणूस इतके खोटे बोलतो की खरे आणि खोट्यातला फरकच ते विसरून गेले आहेत, अशा शब्दांत बॉलिवुडच्या एका चित्रपट निर्मात्याने म्हणजे अशोक पंडित यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे.
पंडित यांनी दोन व्हिडीओंचा एक कोलाज जारी केला आहे. हे दोन्ही व्हिडीओ केजरीवाल यांचे आहेत. यातील जुन्या व्हिडीओत ते म्हणताना दिसतात की जेव्हा अयोध्येतील बाबरी मशिद पडली होती, तेव्हा मी माझ्या आजीला विचारले होते की आजी आता तुला आनंद झाला असेल. आता तुझ्या रामाचे मंदिर होणार. तेव्हा आजी मला म्हणाली होती की बाळा भगवान श्रीराम मशिद पाडून असे स्वत:चे घर बनवणार नाहीत.
या जुन्या व्हिडीओसोबत केजरीवाल यांचाच नवा व्हिडीओ अशोक पंडित यांनी टाकला आहे. त्यात केजरीवाल दिल्लीतील ज्येष्ठ नागरिकांना आवाहन करताना दिसत आहेत. एकदा राम मंदिर झाले की मी तुम्हाला सगळ्यांना मोफत अयोध्येला दर्शनासाठी घेउन जाईल असे केजरीवाल या व्हिडीओत बोलताना दिसत आहेत. हे दोन्ही व्हिडीओ एकत्रित जारी करून पंडित यांनी केजरीवालांना सरड्यासारखा रंग बदलणारा माणूस असे म्हणत लक्ष्य केले आहे.