मुंबई – बॉलिवूड आणि ड्रग्ज हे समीकरण काही पुन्हा एकदा प्रकाशात आणणारी घटना नुकतीच समोर आली आहे. बॉलिवूडमधील एका बड्या अभिनेत्रीला पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणी अटक केली आहे. क्रिसन परेरा असं या बॉलिवूड अभिनेत्रीचे नाव आहे. क्रिसनने ‘सडक 2’ आणि ‘बाटला हाऊस’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार क्रिसनला अरब कंट्रीतील पोलिसांनी अटक केली आहे. अभिनेत्रीला संयुक्त अरब अमिरातीतील शारजाह सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आले आहे. सुमारे दोन आठवड्यांपूर्वी तिला ड्रग्जच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. तिच्या कुटुंबाचे म्हणणे आहे की ती शारजाह विमानतळावर उतरल्यापासून तिच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही आणि 72 तासांनंतर त्यांना भारतीय दूतावासाने अभिनेत्रीच्या अटकेची माहिती दिली.
आमच्या मुलीला जाणूनबुजून ड्रग्ज प्रकरणात गोवले जात असल्याचे अभिनेत्रीच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे.याशिवाय क्रिसनची आई प्रेमिला परेरा म्हणाली, ‘माझ्या मुलीची रवी नावाच्या व्यक्तीने फसवणूक केली आहे. त्याने माझ्या मुलीच्या टीमला वेब सीरिजमध्ये काम करण्यासाठी मेसेज केला. दोन भेटीनंतर क्रिसन दुबईला ऑडिशन देण्यासाठी गेली. रवीनेनंतर तिला 1 एप्रिल रोजी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कॉफी शॉपमध्ये बोलावले आणि ऑडिशन स्क्रिप्टचा भाग म्हणून तिला ट्रॉफी दिली. क्रिसनने ही ट्रॉफी सोबत आणली होती, ज्यातून ड्रग्जचा वास येत होता अशी माहिती अभिनेत्रीच्या आईने दिली आहे.
माध्यमांमध्ये क्रिसन परेराची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर पुन्हा एकदा बॉलिवूड आणि ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यामुळे विविध चर्चा सुरु झाल्या आहेत.