चाहत्यांनी अनुभवला जॉकी श्रॉफ यांचा साधेपणा
पवनानगर – हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेता जॉकी श्रॉफ यांनी शुक्रवारी (दि. 12) मावळ तालुक्यातील ठाकर कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले. या भेटीने जॉकी यांचा साधेपणा पवनमावळातील चाहत्यांनी अनुभवला. घरकाम करणाऱ्या तरुणीच्या आजीचे निधन झाल्याचे समजल्यानंतर जॉकी थेट या तरुणीच्या घरी म्हणजेच पवनानगर (ता. मावळ, जि. पुणे) येथे पोहचले आणि कुटुंबियांचे सांत्वन केले.
कडधे गावातील संजय ठाकर यांच्या मातोश्री तान्हाबाई सखाराम ठाकर यांचे दहा दिवसांपूर्वी निधन झाले होते असे समजताच शुक्रवारी सकाळी 11 वाजता जॉकी श्रॉफ यांनी ठाकर कुटुंबाची घरी येऊन भेट घेत व सांत्वन केले. विशेष म्हणजे श्रॉफ यांच्याकडे काम करणारी दीपाली तुपे या तरुणीची स्वर्गीय तान्हाबाई ठाकर या आजी होत. दीपाली संगम तुपे या संजय ठाकर यांच्या मुलीचे श्रॉफ यांच्या परिवाराशी चांगले नाते निर्माण झाले आहे. आपल्या संबंधातील मोहिनी यांच्या आजीचे निधन झाल्याने ते कडधे गावात आले.
जॉकी श्रॉफ यांनी आजीच्या प्रतिमेस पुष्प वाहिले. कै. तान्हाबाई या आजी 100 वर्षांपर्यंत निरोगी कशा राहिल्या याची माहिती व त्याचा दैनंदिन जीवनक्रम जॉकी श्रॉफ यांनी जाणून घेतला व या परिवाराचे सांत्वन केले.
या वेळी परिवारातील वडीलधाऱ्यांचे श्रॉफ यांनी दर्शन घेतले. सर्वांनी निरोगी राहण्यासाठी आजीप्रमाणे दिनक्रम ठेवा असे ठाकर परिवाराला सांगितले.
यावेळी परिवारातील सदस्य उपस्थित होते. करोना पुन्हा वाढत आहे “आपण सर्वांनी या काळात काळजी घ्या’ व इतरांनी ही काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. यानंतर ठाकर त्यांनी परिवारासोबत चहापान केला.