मुंबई – बॉलीवूडच्या (Bollywood) सुपरस्टार कोरिओग्राफी सरोज खान (Saroj Khan) यांनी अनेक अभिनेत्रींना स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. यात बॉलीवूडची धकधक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षितचाही (Madhuri Dixit) समावेश आहे. बॉलीवूडमध्ये सर्वात लोकप्रिय डान्सर म्हणून तिला एक ओळख मिळाली आहे. यात सरोज खान यांचा वाटा महत्वाचा आहे. मात्र आता कोरिओग्राफर सरोज खान यांच्या बायोपिकची चर्चा सुरु झाली आहे. तसेच यात महत्वाची भूमिका कोण साकारणार? हा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.
सरोज खान यांच्या बायोपिकमध्ये एक नव्हे तर आणखी तीन अभिनेत्री काम करणार असल्याचेही म्हंटले जात आहे. मात्र प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. यावर त्यांची मुलगी सुकैना खान (Sukina Khan) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ती म्हणाली की, ‘अद्याप चित्रपटाचे कोणतेही नाव फायनल झालेले नाही. चित्रपटाविषयी काही ठरलेले नाही. चित्रपटाच्या टीमने मला सांगितले की जेव्हा अभिनेत्रीची निवड होईल, तेव्हा ते आमच्या कुटुंबाला सांगतील. सध्या योग्य अभिनेत्रीला कास्ट करणं कठीण काम आहे.”
दरम्यान, बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये सरोज खान यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी सुमारे 2000 गाणी कोरिओग्राफ केली आहेत. “कलंक’ चित्रपटात त्यांनी अखेरच्या वेळी आवडती अभिनेत्री माधुरी दीक्षितसोबत काम केले होते. सरोज खान या बॉलीवूडमधील एकमेव नृत्य दिग्दर्शका आहेत ज्यांना तीन वेळा सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. ‘देवदास’ चित्रपटाच्या ‘डोला रे डोला’, “जब वी मेट’मधील “ये इश्क हाय’ आणि ‘श्रृंगारम’ या चित्रपटातील गाण्यात भारतीय पारंपरिक नृत्य प्रकाराचे कोरिओग्राफसाठी सरोज खान यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.