बीड – बीड-परळी मार्गावरील जरूड फाट्यावर पिकअप आणि बोलेरोची समोरासमोर धडक होऊन मोठा अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना पहाटे तीन वाजताच्या सुमारास घडली. रवी मिटकर, सोनाली मिटकर (दोघेही रा. घटसावळी तांडा, बीड) अशी अपघातात मृत्यू पावलेल्यांची नावे आहेत.
मयत सोनाली यांच्या दोन वर्षांच्या बाळाला रात्री ताप आला होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी बोलेरो जीपमधून चौघेजण बीडकडे निघाले होते. यावेळी भूम येथून परळीकडे भाजीपाला घेऊन निघालेल्या मालवाहू पिकअप चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि बोलेरो-पिकअपची समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघातात जीपचा चुराडा झाला असून दोघांचा जागीच मृत्यू झाला. चालक विशाल अर्जुन मिटकर (वय 27) हा जखमी असून गौरव माधव मिटकर (वय 2) आणि माधव नागोराव मिटकर (वय 35) हे थोडक्यात बचावले.
पिंपळनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या भीषण अपघातात आई आणि चुलत्याचा मृत्यू झाल्यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.