“बोलबच्चन ठाकरे सरकार करोना थैमानाचा सामना ट्विटर आणि फेसबुकवरून करतंय”

भाजप नेते अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारला लगावला टोला

मुंबई : महाराष्ट्रातील अनेक शहरांत ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्याने रुग्णांसह नातेवाईकांचे हाल सुरू आहेत. राज्य सरकारकडून एकीकडे कंपन्यांशी चर्चा केली जात असताना इतर राज्यांमधून ऑक्सिजन कसा आणता येईल यासाठी केंद्राकडे मदत मागितली आहे. दरम्यान यावरुन भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे.

“ऑक्सिजन नसल्यामुळे कंदिवलीतील ESIC हॉस्पिटलमधून सर्व करोना रुग्णांना घरी पाठवण्यात आलं. परिस्थिती भीषण आहे आणि महाराष्ट्रातले बोलबच्चन ठाकरे सरकार करोना थैमानाचा सामना ट्विटर आणि फेसबुकवरून करत आहे,” अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.

मुंबई पालिकेच्या वांद्रे येथील भाभा रुग्णालय, कुर्ला येथील भाभा रुग्णालय, बोरिवलीतील भगवती रुग्णालय, गोवंडी येथील शताब्दी, मुलुंड येथील एम. टी. अग्रवाल, जोगेश्वारीतील ट्रॉमा रुग्णालय या सहा रुग्णालयांतील ऑक्सिजनचा साठा संपुष्टात आला. त्यामुळे तेथील १६८ रुग्णांना इतर रुग्णालये आणि करोना केंद्रात स्थलांतरित करण्यात आले. मुंबई महापालिकेच्या डॅशबोर्डवरील आकडेवारीनुसार अतिदक्षता विभागातील एकूण २,७११ पैकी केवळ ३७, तर व्हेंटिलेटरची सुविधा असलेल्या १,३५८ पैकी केवळ १७ खाटा शिल्लक आहेत. ऑक्सिजनची सुविधा असलेल्या १,१९५ खाटा रिकाम्या आहेत.

मुंबईतील पालिकेच्या २४ प्रशासकीय विभागात ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राखता यावा, यासाठी अन्न व औषध प्रशासन, तसेच ऑक्सिजन उत्पादक आणि संबंधित सहायक आयुक्त यांच्यासमवेत समन्वय साधण्यासाठी पालिकेने सहा समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, सर्व पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी तसेच पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्यासह सर्व अतिरिक्त आयुक्त परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.