लेखा अधिकाऱ्याकडून उकळली 5 लाखांची खंडणी

महिला सामाजिक कार्यकर्तीसह चालक जेरबंद

पुणे – सहायक लेखा अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करत पाच लाखांची खंडणी उकळणाऱ्या एका सामाजिक कार्यकर्तीस तिच्या चालकास गुन्हे शाखेने जेरबंद केले. ही कारवाई विश्रांतवाडी येथील सहायक आयुक्‍त समाजकल्याण कार्यालय येथे केली.

32 वर्षीय महिला आणि आकाश महादेव शेलार (वय 26, रा. बारामती) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सहायक लेखा अधिकारी श्रीकांत बगलप्पा बनसोडे (54) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

फिर्यादी हे सध्या महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ मर्यादीत (पुणे) येथे सहायक लेखा अधिकारी म्हणून काम पाहतात. 2018 पासून त्यांच्याकडे जिल्हा व्यवस्थापक पदाचा अतिरिक्‍त कार्यभार आहे. महात्मा फुले मागासवर्गीय कर्ज योजनेतील कर्ज वितरणाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. दरम्यान, आरोपी महिलेने फिर्यादींविरुद्ध मागासवर्गीय कर्ज हमीचे पाच टक्‍के सहभाग व शासकीय हमीचे डीडी त्यांनी अनधिकृपने स्वीकारुन मनमानी कारभार केल्याची तक्रार पुणे जिल्हा व्यवस्थापक यांच्याकडे केली होती.

तसेच त्यांची सोशल मीडियाद्वारे बदनामीही केली होती. ही तक्रार मागे घेण्यासाठी व फिर्यादींची सोशल मीडियाद्वारे बदनामी थांबवण्यासाठी आरोपी महिलेने 10 लाखांच्या खंडणीची मागणी केली होती. यातील पाच लाख देण्याचे फिर्यादीने कबुल केले होते. यानंतर याची तक्रार फिर्यादीने पोलीस आयुक्‍त कार्यालयात केली होती. त्यानुसार अपर पोलीस आयुक्‍त गुन्हे अशोक मोराळे यांनी याची दखल घेत तपासाच्या सूचना गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाला दिल्या होत्या. पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, उपनिरीक्षक विजय झंजाड, कर्मचारी शंकर पाटील, सचिन ढवळे, साळुंखे, खुनवे यांच्या पथकाने सापळा रचून खंडणी स्वीकारण्यासाठी आलेल्या चालकाला पकडले.

सरकारकडून मंजूर झालेली रक्‍कम लॉकडाऊन काळात लाभार्थ्यांना मिळाली नव्हती. ती फिर्यादीने स्वत: बळकावली असे धमकी व प्रचार आरोपी महिला करत होती. तीने पैसे घेताना दोन ते तीनवेळा वेगवेगळी ठिकाणे सांगितली. अखेर फिर्यादीने तिला इतर ठिकाणी येऊ शकत नाही, कार्यालयात येऊन पैसे घेऊन जा असे सांगितले. यामुळे ती कार्यालयात आली. मात्र, कार्यालयात पैसे न घेता तीने ते गाडीमध्ये ठेवण्यास सांगितले.
– अंजुम बागवान, पोलीस निरीक्षक

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.