तुळशीबाग, हॉंगकॉंग लेन सुरु, मंडईही उलाढाल
पुणे – करोना, लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मागील अडीच महिन्यांपासून बंद असणारी दुकाने पुन्हा एकदा सजली आहेत. महिलांच्या जिव्हाळ्याची तुळशीबाग, हॉंगकॉंग लेन सुरक्षेबाबत खबरदारी घेत शुक्रवारपासून सुरू झाली. दरम्यान, पहिल्याच दिवशी खरेदीसाठी नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. परंतु, काहींना सोशल डिस्टन्सिंगचा विसर पडल्याचे चित्र होते.
लॉकडाऊन-5 मध्ये अनेक नियम शिथिल करण्यात आले. यामध्ये अनेक व्यवसाय, खासगी कार्यालये, दुकाने आदींना परवानगी देण्यात आली. याच पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे जवळपास अडीच महिने बंद असणारी शहराच्या मध्यवर्ती पेठांतील दुकाने, तुळशीबाग, डेक्कन येथील हॉंगकॉंग लेन, मंडई आदी खरेदीची ठिकाणे शुक्रवारपासून सुरू झाली. महापालिकेच्या नियमावलीनुसार टप्प्याटप्प्यात म्हणजेच पी-1, पी-2 पद्धतीने तारखांनुसार दुकाने खुली करण्यात येणार आहेत.
तुळशीबागेमध्ये शुक्रवारी रस्त्याच्या डाव्या बाजूची दुकाने खुली केली होती. यामध्ये कपडे, दागिने, ऍक्सेसरिज, बॅग, गृहोपयोगी वस्तू आदींची दुकाने उघडण्यात आली. पहिल्याच ग्राहकांची गर्दी होती. यामध्ये विशेषत: महिलांचा समावेश होता. बहुतांश नागरिकांनी खबरदारी घेत, मास्क वापरत खरेदी केली.
व्यावसायिकांकडून खबरदारी
– दुकानातील कर्मचाऱ्यांकडून मास्क, हातमोजे आदीचा वापर
– दुकानांचे वारंवार निर्जंतुकीकरण
– ग्राहकांसाठी सॅनिटायझर, तापमान तपासण्याची व्यवस्था
– मंडईत ओटा क्रमांकानुसार परवानगी
शहरातील गर्दीचे आणखी एक ठिकाण असलेल्या मंडईमध्ये ग्राहकांची वर्दळ सुरू झाली आहे. येथील ओटा क्रमांकानुसार परवानगी देण्यात आली आहे. सम ओटा क्रमांक असणारे विक्रेते सम तारखेला आणि विषम ओटा क्रमांक असणारे विक्रेते विषम तारखेला गाळे सुरू करू शकणार आहेत, असे प्रशासनाने सांगितले.
उपनगरेही गजबजली
शहरातील टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, डेक्कन, जंगली महाराज रस्ता या मध्यवर्ती भागासह सातारा रस्ता, सिंहगड रस्त्यावरील अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. टिळक रस्त्यावर भर दुपारी, साधारण बाराच्या सुमारास वाहनांची रांग असल्याचे चित्र होते. मध्यवर्ती भागाप्रमाणेच उपनगरांमध्ये देखील हीच स्थिती होती. त्यामुळे अर्थचक्राला काही अंशी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
वाहतूक पोलिसांची गरज
काही चौकांमध्ये वाहतूक पोलीस अनुपस्थित होते. पर्यायाने नागरिक नियमांचे उल्लंघन करत वाहन चालवत होते. त्यामुळे वाहनचालकांमध्ये पुढे जाण्यासाठी वाद देखील होत असल्याचे चित्र होते. त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक जाम झाली होती.