वय वाढवून ज्येष्ठ होण्याचे प्रताप : वल्लभनगर आगारात मोठ्या संख्येने आधारकार्ड जप्त
पिंपरी – ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्य सुसह्य व्हावे, यासाठी सरकार प्रयत्न करत असते. ज्येष्ठ नागरिकांना स्वस्तात प्रवास करता यावा, यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून तिकिटाच्या दरात मोठी सवलतही दिली जाते. पूर्वी सवलतीसाठी मोठ्या प्रमाणात एसटी महामंडळाची फसवणूक केली जात होती. एसटीचे नुकसान कमी व्हावे आणि ज्येष्ठांनाच सवलतीचा लाभ मिळावा, तसेच कारभारात पारदर्शकता यावी, यासाठी स्मार्टकार्डचा घाट घालण्यात आला. परंतु यातही बोगसगिरी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. वय वाढवून ज्येष्ठ होणारे बोगस आधारकार्ड मोठ्या संख्येने वल्लभनगर आगार प्रशासनाकडून जप्त करण्यात आले आहेत.
ज्यांनी अजून वयाची साठीही पार केली नाही, अशा काही नागरिकांनी वाढीव वयाचे बोगस आधारकार्ड तयार करुन राज्य परिवहन महामंडळाकडून (एस.टी) दिले जाणारे स्मार्टकार्ड मिळविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. मात्र, स्मार्टकार्ड काढत असताना ऑनलाइन तपासणी दरम्यान दिलेले बनावट आधारकार्डचे पितळ उघडे पडत असल्याने त्यावर आगार प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत असून बनावट कार्ड जप्त करण्यात येत आहे.
स्मार्टकार्ड नोंदणीची सुरुवात वल्लभनगर आगारात 4 जून पासून करण्यात आली असून डिसेंबर अखेरपर्यंत स्मार्टकार्ड काढण्याची मुदत आहे. 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनाच स्मार्टकार्ड मिळत असल्याने कमी वय असणाऱ्या नागरिकांकडून बनावट आधारकार्डचा प्रकार घडत आहे. स्मार्टकार्ड मिळविण्यासाठी वयाचे 65 वर्ष पूर्ण, 50 रुपये शुल्क, मोबाईल नंबर, आधारकार्ड व जेष्ठ नागरिकाच्या हाताच्या अंगठ्याचे ठसे आदींची आवश्यकता आहे. स्मार्टकार्ड काढल्यावर ज्येष्ठ नागरिकांना वर्षभरात 4 हजार किलोमीटर पर्यंत 50 टक्के सवलतीने प्रवास करता येऊ शकतो. यामुळे आधारकार्डमध्ये फेरफार करुन स्मार्टकार्ड मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
ऑनलाइन तपासणीत पितळ उघडे
बनावट मतदान कार्डवर वय वाढवून एसटी बसमधून अवैध प्रवास करणाऱ्यांना चाप बसावा, यासाठी एसटी महामंडळाकडून स्मार्टकार्डची योजना सुरू करण्यात आली आहे. जेणेकरुन एसटी तिकीटाबाबत पारदर्शकता येईल. मात्र, स्मार्टकार्ड सुद्धा बोगस आधारकार्डच्या माध्यमातून काढण्यासाठी काही नागरिकांकडून प्रयत्न केले जात आहेत. परंतु आगारात स्मार्टकार्ड नोंदणीवेळी ऑनलाइन तपासणी दरम्यान आधारकार्ड बनावट असल्याचे किंवा फेरफार करुन वय वाढविल्याचे तत्काळ दिसून येते. तसेच आधारकार्डावरील खरी माहिती समोर येते. यामुळे बोगस आधारकार्ड आगार प्रशासनाकडून जप्त करण्यात येते. आतापर्यंत वल्लभनगर आगारात शंभरपर्यंत बनावट आधारकार्ड जप्त करण्यात आले आहेत.
बनावट आधारकार्ड घेऊन येणाऱ्या नागरिकांचे कार्ड सध्यातरी आगार प्रशासनाकडून जप्त करण्यात आले आहे. मात्र, वरिष्ठाच्या आदेशानुसार यापुढे कठोर कारवाई करण्यात येईल.
– पल्लवी पाटील, वल्लभनगर स्थानक प्रमुख.