वैद्यकीय सावळा गोंधळ : नागरिकांच्या जीवाशी खेळ
वडगाव मावळ – मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांनी “दुकानदारी’ थाटली असून, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे. चुकीचा उपचार केल्याने रुग्णांचा बळी जात असून, नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या डॉक्टरांची “उद्योग’ कधी थांबणार असा सवाल मावळवासियांनी उपस्थित केला आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती आणि महामार्गालगत असणाऱ्या गावात दिवसेंदिवस नागरी वस्ती वाढत असल्याने परप्रांतीय बोगस डॉक्टर तसेच खासगी हॉस्पिटलमध्ये कामाचा अनुभव असलेले बोगस व्यक्ती आपली दवाखाने थाटतात. हे बोगस डॉक्टर नाममात्र शूल्क घेऊन किरकोळ रुग्णांना वैद्यकीय उपचार देतात. काही रुग्णांच्या आजाराचे निदान होत नसल्याने चुकीचे औषधोपचार त्यांच्याकडून दिले जातात. रुग्ण गंभीर होताच त्याला शहराच्या दवाखान्यात जाण्याचा सल्ला देतात. त्या रुग्णावर चुकीच्या औषधोपचार केल्याने रुग्ण दगावण्याची शक्यता अधिक आहे.
बोगस डॉक्टर हे ग्रामीण भागातील नेतेमंडळींच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. त्यामुळे डॉक्टरांच्या चुकीवर पांघरून घालण्यासाठी ते नेहमी सरसावतात. तालुक्यातील आर्थिक दुर्बल, आदिवासी बोगस डॉक्टरांच्या जाळ्यात फसतात.
सर्दी, खोकला, ताप यांसारख्या आजारांवर तात्पुरती उपाय योजना करून आजारावर उपचार केले जातात. आता “या’ डॉक्टरवर कारवाई करण्याचा अधिकार प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना असतो. त्यांच्याकडे या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे लक्ष जात नसल्याने त्यांचे गोरखधंदे जोमात सुरू असतात. दवाखाना सुरू करण्यापूर्वी ग्रामपंचायतीचा ना-हरकत दाखला आवश्यक असतो. मावळ तालुक्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी किशोर सातकर, अमोल धिडे, सोमा भेगडे, युवराज शिंदे, आशिष खांडगे, हरीश दानवे, शरद मोरे आदींनी केली.
मागील काही दिवसांत मावळ तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. चुकीचा औषधोपचार झाल्याने रुग्णांचा जीव गेल्याच्या घटना घडत आहेत. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याचा अधिकार आहे. त्यांना बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याच्या लेखी सूचना दिल्या आहेत. ग्रामपंचायतीने गावात दवाखाना सुरू करताना डॉक्टरांच्या शैक्षणिक पात्रतेची आणि प्रमाणपत्राची खात्री करूनच त्यांना ना-हरकत प्रमाणपत्र दिले पाहिजे. त्यामुळे बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट थांबेल. नागरिकांनी अशा बोगस डॉक्टरांची माहिती द्यावी.
– डॉ. चंद्रकांत लोहारे, आरोग्य अधिकारी, मावळ.