नवी दिल्ली – राष्ट्रवादी पक्ष (Ncp) आणि घड्याळ चिन्ह कोणाचे यावर निवडणूक आयोगात सोमवारी सुनावणी झाली. सलग तीन दिवस सुनावणीचा आज पहिला दिवस होता. अजित पवार गटाकडून (Ajit Pawar Group) कार्यकर्त्यांची बोगस शपथपत्र आयोगात जमा करण्यात आली आहे, एवढेच नाही तर पदाधिकाऱ्यांचीही बोगस प्रमाणपत्र जमा केल्याचा आरोप शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी केला आहे. (Ncp Split)
निवडणूक आयोगातील या सुनावणीला शरद पवार स्वतः हजर होते. त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. तर अजित पवार गटाच्या बाजूने आज प्रथमच अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार (Parth Pawar) हे सुनावणीला उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. यावेळी त्यांच्यासोबत खासदार सुनील तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर उपस्थित होत्या. (Abhishek manusinghavi)
केंद्रीय निवडणूक आयोगात आज सुनावणी सुरु झाल्यानंतर वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी बोगस शपथपत्रांचा मुद्दा उपस्थित केला. मागील सुनावणीतही त्यांनी यावरुन अजित पवार गटावर आरोप केले होते. तोच मुद्दा पुन्हा उपस्थित केल्याने निवडणूक आयोगाने शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांच्या युक्तीवादावर नाराजी व्यक्त केली. यामुळे आयोगाच्या कार्यालयातील वातावरण तापले होते. अजित पवार गटाच्यावतीने नीरज किशन कौल आणि मनिंदर सिंह यांनी युक्तीवाद केला.
तब्बल तीन तासांच्या सुनावणीनंतर माध्यमांशी संवाद साधताना वकील अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की, अजित पवार गटाने निवडणूक विभागात प्रतिज्ञापत्र सादर करणाऱ्या व्यक्तीला आज सादर केले. कारण, या व्यक्तीला माहितीच नाही की त्यांच्या नावाचे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहे. तेव्हा जो अशी फसवणूक करतो, त्याला कोणत्याच पातळीवर सूट देणे चुकीचे आहे. जो व्यक्ती न्याय मागत आहे. त्याला योग्य वेळेत न्याय मिळणे गरजेचे असल्याचे सिंघवी यावेळी म्हणाले.
प्रतिज्ञापत्रात शरद पवारांना विरोध नाही
निवडणूक विभागात युक्तिवाद करताना अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडण्यात आल्याचे सांगत अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितले की, अजित पवार गटाने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये कोणीच शरद पवारांना मी विरोध करतो असे म्हटले नाही. खोटे सांगून प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये निवडणूक आयोग योग्य तो निर्णय देऊन आम्हाला न्याय देईल अशी अपेक्षा असल्याचेही शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी यावेळी सांगितले.