काठमांडू : नेपाळमध्ये भूस्खलनानंतर वाहून गेलेल्या २ बसमधील १९ प्रवाशांचे मृतदेह आतापर्यंत सापडले आहेत. या सापडलेल्या मृतदेहांमध्ये ४ भारतीय प्रवाशांचेही मृतदेह आहेत. गेल्या आठवड्यात चितवान जिल्ह्यात झालेल्या प्रचंड भूस्खलनानंतर या २ प्रवासी बस त्रिशुल नदीमध्ये वाहून गेल्या होत्या.
या बसमध्ये भारताचे एकूण ७ प्रवासी होते. यातील विवेक कुमार (२७) नावाच्या प्रवाशाचा मृतदेह बुधवारी सापडला होता. यापूर्वी, ऋषी पाल शाह (२८), जयप्रकाश ठाकूर (३०) आणि साजाद अन्सारी (२३) या तिघांचे मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले होते.
आज सापडलेल्या इतर मृतदेहांमधील भारतीय अजून ओळखले गेलेले नाहीत. या प्रवाशांची ओळख पटवण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच उर्वरित प्रवाशांचा शोध घेण्यासाठी नेपाळमधील अधिकारी बिहार आणि उत्तर प्रदेशच्या अधिकाऱ्यांच्या समन्वयाने प्रयत्न करत आहेत.